शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागास वर्ग प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा उद्देश आहे.
योजनेचे स्वरुप : राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 10 लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज 20 लाख.
लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे तो इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लाखापर्यंत असावे. अर्जदार इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्क्म अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0, -1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.
व्याजचा परतावा : महामंडळ केवळ बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल.
कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे : अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला. उत्पन्नाचा दाखला. महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड. ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो. अर्जदाराचा जन्माचा/वयाचा दाखला. शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र. शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कमाफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र. मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. आधार संलग्न बँक खाते पुरावा.
अभ्यासक्रम : राज्यांतर्गत अभ्यासक्रम – केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खासगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रॅकिंग/गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduatc Rccord Exam (GRE), Test of English as a Foreing Language (TOEFL) उत्तीर्ण झालेला विद्यार्थी.
व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी : शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रक्कमेचा परतावा ( कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करेल. व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.
अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, खोली नं.3 जुनी एमआयडीसी रोड बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुला जवळ, सातारा व 02162-295184 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Maharashtra Government Scheme Education Loan