नवी दिल्ली – भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराची लोकपालाकडे तक्रार करण्यासाठी आता प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यासाठी आता नागरिक घरबसल्या तक्रार करु शकणार आहेत. यासाठी स्वतंत्र वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
लोकपालचे अध्यक्ष, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांनी ‘लोकपाल ऑनलाइन’ नावाच्या तक्रारींच्या व्यवस्थापनासाठीच्या डिजिटल मंचाचे उद्घाटन केले. ज्याचा वापर करून देशातील सर्व नागरिक कोठूनही, कधीही तक्रारी नोंदवू शकतात.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष म्हणाले की, भ्रष्टाचार हा अर्थव्यवस्थेच्या कमकुवत कामगिरीचा एक महत्त्वाचा घटक असून तो लोकशाही आणि कायद्याच्या राज्याला धोका उत्पन्न करतो. ते म्हणाले, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या लोकसेवकांविरुद्धच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकपालऑनलाइन ही एंड-टू-एंड म्हणजे अथ पासून इति पर्यंतची डिजिटल उपाययोजना आहे. न्यायमूर्ती घोष म्हणाले की, लोकपालऑनलाइन ही वेब-आधारित सुविधा आहे, जी सर्व हितधारकांच्या फायद्यांसह जबाबदार, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने तक्रारींचा निपटारा करते.
या डिजिटल मंचाची वैशिष्ट्ये अशी
http://lokpalonline.gov.in ही वेबसाईटवर जावे
तक्रारदारांना कुठूनही कोणत्याही वेळी ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सोय
तक्रारदारास प्रत्येक टप्प्यावर ई-मेल आणि एसएमएसद्वारे तक्रारीवरील कारवाईची माहिती
तक्रारकर्त्याला कधीही तक्रारीची सद्यस्थिती तपासण्याची सुविधा
तक्रारीची ओळख गोपनीय ठेवली जाते
CVC, CBI आणि इतर चौकशी संस्था त्यांचे अहवाल थेट ‘लोकपालऑनलाइन’ मंचावर अपलोड करू शकतात.
चौकशी संस्थांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे स्मरणपत्रे
आवश्यकतेनुसार विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे