मुंबई – केंद्रीय वस्तू आणि सेवा कर भिवंडी आयुक्तालयाच्या, कर चुकवेगिरी विरोधी शाखेने, महाराष्ट्रातल्या बनावट आस्थापनांचे जाळे उध्वस्त केले आहे. प्रत्यक्षात मालाचा पुरवठा न करता इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ आणि उपयोग करण्यात या बनावट आस्थापनांचा हात होता. नवी मुंबई, ठाणे आणि पालघर इथे बारापेक्षा जास्त ठिकाणी यासाठी झडती घेण्यात आली.
मेसर्स श्री बालाजी स्टीलने, विविध बनावट आस्थापनांद्वारे 6.23 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा दावा करत वेगवेगळ्या ग्राहकांकडे तो हस्तांतरित केल्याचे चौकशीत उघड झाले. कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकाला काल 12 डिसेंबर 2021ला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना मुंबईतल्या फोर्ट इथल्या अतिरिक्त मुख्य शहर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. अधिक तपासाअंती, कर चुकवेगिरी करण्यात आलेली रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कर चुकवेगिरीचे प्रकार वाढले
नुकतेच उघडकीला आणलेले हे प्रकरण म्हणजे मुंबई सीजीएसटीने सप्टेंबर 2021 मध्ये सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी आणि महसुलात वृद्धी होण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. विदाची बारकाईने तपासणी आणि विश्लेषण यावर ही मोहीम आधारलेली आहे. विवरण पत्र दाखल करण्यात आणि आणि इतर बाबींमध्ये, कर चुकवणाऱ्याचा पूर्वेतिहास तपासल्यानंतर स्पॉट प्रोफाईलिंगसाठी विशेष माहिती तंत्रज्ञान टूलचा वापर करण्यात येतो.
तब्बल 3500 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी या मोहिमेतून उघडकीला आली असून 460 कोटी रुपये वसूल झाले आहेत तर 30 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रामाणिक आणि अनुपालन करणाऱ्या करदात्यांना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्राच्या सेवेप्रती वस्तू आणि सेवा कर संकलन वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने मुंबई सीजीएसटी आपली मोहीम आणखी तीव्र करणार आहे.