आता लिंक्डइनवरील तब्बल ५० कोटी युजर्सचा डेटा चोरी

नवी दिल्ली – फेसबुकनंतर आता प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनच्या ५० कोटी युजर्सचा डाटा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. फेसबुकच्या युजर्सचा डाटा लीक झाल्याची घटना ताजी असतानाच लिंक्डइनचा डाटा लीक झाल्यामुळे सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मायक्रोसॉफ्टची व्यावसायिक कंपनी असलेल्या लिंक्डइनने ५० कोटी युजर्सची माहिती चोरून कथितरित्या इतरांना विकल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका लोकप्रिय हॅकर फोरमवर कंपनीचा स्क्रॅप केलेला डाटा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हॅकिंग करत असलेल्या लोकांनी लीक झालेल्या २० लाख नोंदणीचीं माहिती नमुना म्हणून फोरमवर ठेवले आहे.
युजर्सचे नाव, फोन नंबर, ईमेलसह अनेक माहिती लीक झालेली आहे. लीक झालेल्या ४ फाईलमध्ये लिंक्डइन युजर्सचे नाव, त्यांचे कार्यस्थळ, ईमेल आणि फोन नंबरसह अधिक संवेदनशील माहिती देण्यात आली होती, असे एका अहवालात म्हटले आहे.
हॅकर फोरमवर २ डॉलरमध्ये लीक झालेली माहिती कोणीही पाहू शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लिंक्डइनने गुरुवारी एक निवेदन जारी केले आहे. विक्रीसाठी पोस्ट केलेल्या लिंक्डइनच्या डाटाच्या कथित सेटची चौकशी केली असून, तो डाटा लिंक्डइनचा नाही, असे स्पष्टीकरण लिंक्डइनने दिले आहे. लिंक्डइनच्या कोणत्याच अकाउंटचा डाटा चोरी झालेला नाही, असे आतापर्यंत घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट होत आहे, असे लिंक्टइनने म्हटले आहे.