नवी दिल्ली – भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओबाबत केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी सरकारने गोल्डमॅन साक्श (इंडिया) सिक्टेरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया आणि नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज इंडियासह दहा मर्चंट बँकांची नियुक्ती केली आहे.
निर्गुंतवणूक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, या महाकाय आयपीओच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बँकांमध्ये एसबीआय कॅपिटल मार्केट, जेएम फायनॅन्शिअल, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्योरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया, आयसीआयसीआय सिक्टोरिटीज आणि कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी लि. या कंपन्यांचा समावेश आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (दीपम) चे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, सरकारने एलआयसीच्या आयपीओसाठी विविध व्यवस्थापनांची तसेच सल्लागारांची नियुक्ती केली आहे. विभागाने मर्चंट बँकांकडून १५ जुलैला अर्ज मागविले होते. त्यानंतर १६ मर्चंट बँकांनी एलआयसीच्या आयपीओ व्यवस्थापनासाठी सादरीकरण केले होते. समभागाची विक्री तसेच विधी सल्लागारांच्या नियुक्तीसाठी दीपमकडून प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी बोली लावण्याची १६ सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.