मुंबई – रियालन्स समुहाचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आपल्या आरोपपत्रात सचिन वाझे अँड कंपनीच्या कटाचा पर्दाफाश केला. त्यामध्ये मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंहसुद्धा संशयाच्या फे-यात आले आहेत. आरोपपत्रात त्यांच्या नावाचा थेट उल्लेख नसला तरी एका सायबर तज्ज्ञाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, परमवीर सिंह यांनी जैश-उल-हिंदच्या धमकीचा बनावट टेलिग्राम मेसेज बनविण्यासाठी सायबर तज्ज्ञांना पाच लाख रुपये दिले होते. त्यावरून सिंह हे तपासाची दिशाभूल करत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
अँटिलिया स्फोटके आणि हिरे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने १० हजार पानांचे आरोपपत्र तयार करून न्यायालयाला सुपूर्द केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सायबर तज्ज्ञांनी ५ ऑगस्टला एनआयएसमोर जबाब नोंदविला. ते म्हणाले, की ९ मार्च २०२१ ला एक प्रशिक्षणासाठी मुंबई पोलिस कार्यालयात गेले होते. त्याच बैठकीदरम्यान परमवीर सिंह यांनी टेलिग्राम वाहिनीवर जैश उल हिंदची २७ फेब्रुवारीला जबाबदरी घेणारी एक पोस्ट दाखविली होती. सायबर तज्ज्ञाच्या माहितीनुसार, मीसुद्धा अशा प्रकारचे चॅनल बनवू शकतो. दिल्लीमध्ये इस्त्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या तपासात मी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला सहकार्य केले आहे. त्यानंतर परमवीर सिंह यांनी अँटिलिया प्रकरणी धमकीची जबाबदारी घेऊन मेसेज टेलिग्रामवर जैश उल हिंदच्या पानावर दिसणा-या पोस्टरवर टाकण्यास सांगितले होते.
वाझेच्या मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासे
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील प्रमुख आरोपी सचिन वाझेची प्रेयसी मीना जॉर्ज हिने वाझेबद्दल अनेक धक्कदायक खुलासे केले आहेत. मीनाने एनआयएला सांगितले, की ती महिला एस्कॉर्ट होती. २०११ मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिची सचिन वाझेशी भेट झाली होती. त्यानंतर ती वाझेशी सतत संपर्कात होती. मुंबई पोलिसांत पुन्हा रुजू झाल्यानंतर वाझेने मीनला एस्कॉर्टची नोकरी सोडण्यास सांगितले होते. त्याबदल्यात वाझे तिला खर्चासाठी ५० हजार रुपये देत होता. वाझेने वेगवेगळ्या प्रसंगी ४० लाख आणि ३६ लाख रुपये दिले होते, असेही मीनाने एनआयएला सांगितले.
वाझेचा वाहनचालकही अनभिज्ञ
अँटिलिया स्फोटकांप्रकरणी कटाचा पर्दाफाश होऊ नये यासाठी सचिन वाझेने आपल्या अधिकृत वाहनचालकाला सांगितले होते की, ही गोपनीय मोहीम आहे. वाहनचालकाने एनआयएला अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार उभी करण्याचा घटनाक्रम सांगितला. त्याने सांगितले, की २४ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेपाच वाजता सचिन वाझेला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी या बंगल्यावर घेऊन गेला होता. वाझे एकटेच देशमुख यांच्या निवासस्थानी गेले आणि एका तासानंतर परत आले.