धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुतखड्याच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रूग्णांना आता एक नवसंजीवनी मिळाली आहे. जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लिथोस्ट्रेप्सी तंत्रज्ञानाव्दारे उपचाराला सुरवात झालेली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेशिवाय कोणत्याही प्रकारचे मुतखडे काढणे शक्य होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. विजय पाटील यांनी दिली आहे.
धुळे जिल्हा व परिसरातील कोरडे वातावरण व पाण्यातील अतिक्षार यामुळे मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त आहे. या खडयांमुळे अतिवेदना व किडनीवर परिमाण होतांना दिसून येतात. हे लक्षात घेवून जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्राचे जगप्रसिध्द, गोल्ड स्टॅण्डर्ड डोर्नियर कंपनीचे अतिअद्ययावत लिथोस्ट्रीप्सी मशीन आणण्यात आले आहे. या मशीनव्दारे किडनी व थोडयाफार प्रमाणात मूत्रनलिकेतील मूतखडे वेदनारहीत पध्दतीने ठोके देवून फोडण्यात येतात.
यासाठी शरीरास कोणत्याही प्रकारचा चीरा, इंजेक्शन, सलाईन, भूल द्यावी लागत नाही. त्यामुळे रूग्णास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही व तो मूतखडयाच्या त्रासापासून मुक्त होवू शकतो. या मशीनच्या उपचारासाठी शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांस खूप कमी खर्च लागतो. दरम्यान चाचणी तत्वावर एका २५ वर्षीय युवतीवर यशस्वीपणे लिथोस्ट्रेप्सी उपचार करण्यात आले. त्यासाठी सर्जन डॉ.कैलाश गिंदोडिया यांनी परिश्रम घेतले.
तरी धुळे जिल्हयात जे नागरिक मूतखडयाच्या त्रासाने त्रस्त आहेत त्यांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या लिथोस्ट्रेप्सी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.भाईदस पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ.ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ.विजय पाटील, वैदयकीय अधिक्षक डॉ.मधुकर पवार आदींनी केले आहे.