नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी महिलेसह एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने एक महिना साधा कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. मोठाभाऊ उर्फ दत्तू नारायण शिरसाठ (४४ रा.म्हाडा कॉलनी,सातपूर अंबड लिंकरोड) व भारती जयंत पटेल (४८ रा.रैनबो रो हाऊस पोकार कॉलनी दिंडोरीरोड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना २०१७ मध्ये पांजरापोळ भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पांजरापोळ भागातील सर्व्हे नं. ७४,७५.७६,७७ मध्ये २९ ऑगष्ट २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास दोघे जण वृक्षतोड करतांना मिळून आले होते. कुठलीही परवानगी न घेता दोघा आरोंपीनी सुबाभूळ ११,विलायची चिंच ६,काशिद ६,काटेरी बाभूळ २, कडू निंब १,बोर २ व बॉटल ब्रश दोन नग अशी ३० झाडे बुंध्यापासून तोडून नुकसान केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र शासन (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) चॅप्टर ८ व झाड जतन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन हवालदार एस.जी.मेतकर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट ८ च्या न्या.प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अॅड. एस.एस.चितळकर यांनी काम पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून दोघांना एक महिना साधा कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
Legal Nashik Illegal Tree Cutting Court Sentence