इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एअर इंडियाच्या विमानात सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रवाशाला न्यायालयाने तुरुंगात पाठवले आहे. न्यायालयाने आरोपीला २५ हजार रुपये दंड ठोठावला होता पण आरोपी फक्त २५० रुपये जमा करण्यावर ठाम होता. अखेर आरोपीला तुरुंगात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रत्नाकर द्विवेदी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एअर इंडियाच्या लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावर आरोपीने न्यायालयाला सांगितले की, आयपीसी कलम ३३६ अन्वये २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे त्याने ऑनलाइन वाचले होते. अशा स्थितीत आरोपीने २५० रुपये दंड भरण्याची तयारी दर्शवली मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत आरोपींची तुरुंगात रवानगी केली.
एअर इंडियाने एक निवेदन जारी केले होते की, प्रवाशाने फ्लाइटमध्ये सिगारेट ओढली आणि इतर लोकांशी गैरवर्तन केले. यावर विमानाच्या पायलटने आरोपी प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने पायलटचे ऐकले नाही. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आणि आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
Legal Air India Passenger cigarette Court Penalty