मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक नाव गेली ३५ वर्षे सातत्यानं चर्चेत असायचं. ते म्हणजे लक्ष्मण जगताप. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. अलीकडेच जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या या जुन्या सहकाऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला.
लक्ष्मण जगताप पूर्वीचे भाजपवासी. नंतर मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले आणि मजबुतीनं काम केलं. अजित पवारांनी अलीकडेच जगताप कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी आमदार जगताप यांचा निवडणुकीच्या संदर्भातील एक किस्सा सांगताना अजित दादा म्हणाले, ‘एकदा मी त्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरण्यास सांगितले. आणि त्याचवेळी माझी पुढची सूचना येईपर्यंत फोन बंद ठेव, असे म्हणालो. अपेक्षेप्रमाणे ती जागा काँग्रेसला मिळाली. मला आमच्या उमेदवारावर विश्वास होता पण उपयोग नव्हता. लक्ष्मण जगताप अपक्ष लढले आणि जोरदार विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला तिकीट देण्यात आले आणि तेव्हाही लक्ष्मण जगताप अपक्ष विजयी झाले. पण तरीही त्यांचं मन आणि विचार राष्ट्रवादीसोबत जुळलेले होते.’ त्या दिवशी फोन बंद ठेवला म्हणून पुढचा मार्ग सोपा झाला, असे दादा म्हणाले.
पक्षासाठी दमदार काम
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात माझी एन्ट्री १९९१ मध्ये झाली. त्यावेळी आम्ही या क्षेत्रात जोरदार काम सुरू केले. मी खासदार होतो आणि काम करणारी टीमही मोठी होती. या टीममध्ये लक्ष्मण जगतापही होते. त्यांनी व इतर सहकाऱ्यांनी पक्षासाठी दमदार काम केलं, अशी आठवणही अजित पवारांनी सांगितली.
अजितदादांचं वैशिष्ट्य
अजित पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत राहातं. कधी घोटाळ्यांसाठी, कधी सत्ताधाऱ्यांवरील प्रेमासाठी तर कधी त्यांच्या बिनधास्त भाषणासाठी. पण अजित पवारांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांचं आपल्या कार्यकर्त्यांवर असलेलं प्रेम. आमदार लक्ष्मण जगताप हे त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते होते, पुढे आमदार झाले. पण त्यांच्याशी असलेलं नातं त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपलं.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1610945303087321088?s=20&t=49fDg-JKaCzXTZplNTkrdg
Laxman Jagtap MLA Ajit Pawar Incidence
Politics Pune Pimpri Chinchwad NCP