लासलगाव – लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज तब्बल पाऊण दशकानंतर अमावस्या दिनी कांदा लिलाव होऊन बाजार समिती आता नव्याने जोमाने लासलगांव बाजार समितीचे एकुण कांदा लिलाव ८७१ वाहनातील १६८३३ क्विंटल उन्हाळा कांदा कमीत कमी ७५२ ते जास्तीत जास्त २३०० व सरासरी १८०१ रूपये भावाने विक्री झाला.आज लासलगाव बाजार समितीत प्रथमच लासलगावचे कांदा बाजारपेठ लोकांच्या गर्दीने आणि कांदा घेऊन आलेल्या वाहनाने फुलुन गेली होती. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे व कर्मचारी तसेच व्यापारी,हमाल, कांदा उत्पादकांच्या गर्दीत उत्साहाचे वातावरण भारलेले होते. तसे पाहीले तर या ऐतिहासिक घटनेची बाजार समितीचे इतिहासात सुवर्णक्षराने लिहावी अशी नोंद झाली. लासलगांव मुख्य कांदा बाजार आवारात प्रथमच आज अमावस्येच्या दिवशी परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांद्याचे लिलाव करण्यात आले. ऐतिहासिक घटनेच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहिल्या वाहनातील कांद्याला २३०० रुपये इतक्या बाजार भावाने खरेदी करण्यात आला.
७५ वर्षांपासूनच्या परंपरेला फाटा
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत ७५ वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याच्या या परंपरा खंडित झाली आहे.