आज आहे या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण; बघा, कुठे आणि कधी दिसणार?

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
ज्या दृश्यांसाठी खगोलप्रेमी नेहमीच वाट पाहात असतात असा सूर्यमालेतील एक अद्भूत नजारा आज पाहायला मिळणार आहे. या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज (१० जून) दिसणार आहे. भारतात ते अरुणाचल प्रदेश आणि लडाख या भागात दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. वलयाकार सूर्यग्रहणाची घटना वर्षातून एकाहून अधिक वेळा घडते. परंतु हा अद्भूत नजारा पाहण्यासाठी खगोलप्रेमी नेहमीच तत्पर असतात.
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सरळ एका रेषेत आल्यानंतर हा अद्भूत नजारा पाहायला मिळतो. या प्रक्रियेदरम्यान चंद्र सूर्याची किरणे रोखतो. त्याला आपण सूर्यग्रहण असे म्हणतो. जेव्हा चंद्राच्या मागून हळूहळू सूर्याची किरणे बाहेर पडतात तेव्हा त्याची चमक हिर्याच्या अंगठीसारखी दिसते. त्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात.
भारतात संध्याकाळी ५.५२ वाजता अरुणाचल प्रदेशमधील दिबांग अभयारण्याजवळ सूर्यग्रहण पाहू शकणार आहे. लडाखच्या उत्तर भागात सायंकाळी ६ वाजता सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताशिवाय उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या अनेक भागात सूर्यग्रहण पाहू शकणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये वलयाकार तर उत्तर अमेरिकेच्या बहुतांश भागात, युरोप आणि उत्तर आशियामधील अंशतः सूर्यग्रहण दिसेल. वलयाकार सूर्यग्रहणात सूर्याचा बाहेरील भाग प्रकाशमान दिसतो.  यादरम्यान सूर्याचा मधला भाग चंद्राच्या मागे झाकला जातो.
धार्मिकदृष्ट्या महत्त्व
भारतात सूर्यग्रहणाचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. धार्मिकदृष्ट्या पाहिल्यास वटसावित्री व्रतादरम्यान दिसणार आहे. याशिवाय आज शनिजयंती आणि ज्येष्ठ अमावस्या आहे. तब्बल  १४८ वर्षांनंतर शनिजयंतीच्या दिवशी सूर्यग्रहण दिसत आहे. यापूर्वी २६ मे १८७३ रोजी शनिजयंतीच्या दिवशी ग्रहण लागले होते.