इंडिया दर्पण – हटके डेस्टिनेशन – पद्मनाभस्वामी मंदिर

पद्मनाभस्वामी मंदिर

आपल्या देखो अपना देश या मालिकेत आज आपण आपल्या देशातील किंबहुना जगातील सर्वात श्रीमंत मंदिरास भेट देणार आहोत. भारतातील श्रीमंत, सुशिक्षित व निसर्गसंपन्न राज्य केरळातील पूर्वीचे त्रिवेंद्रम व आजचे थिरुवअनंतपुरम शहरातील पुरातन व प्रसिद्ध देवस्थान श्री पद्मनाभस्वामी  मंदीर. त्याची सफर आज करुया
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
पद्मनाभ मंदिरात ब्रम्ह पुराण, मत्स्य पुराण, वराह पुराण, स्कन्द पुराण, वायु पुराण, भागवत पुराण आणि महाभारताचा उल्लेख सापडतो. इतिहासकार याला स्वर्ण मंदिर असेही म्हणतात. भगवान विष्णूच्या या मंदिरातील मूर्ती शाळीग्राम पासून बनविली आहे. हे मंदिर त्यांचेकडील अद्भुत आणि अविश्वसनीय संपत्तीकरता  नेहमीच चर्चेत असते. मंदिराचे बांधकाम द्राविड शैलीतील आहे. गेली अनेक वर्ष हे मंदिराची व्यवस्था त्रावणकोर संस्थानचे कुटुंबिय पाहतात.
इ.स. ९ मधील तामिळ साहित्य आणि कविता तसेच संतकवी नाम्माल्वर यांच्या नुसार मंदिरातील तसेच शहरात सोन्याच्या भिंती आहेत. ही ठिकाणं, मंदिर, आसपासचा परिसर पाहून स्वर्गात आल्याचा भास होतो. इसवी सन ६ आणि ९  मधल्या तामिळ साहित्य आणि सिध्दांतात आढळलेल्या उल्लेखाप्रमाणे हे मंदिर प्रमुख १०८ मंदिरांपैकी एक आहे. येथील एकूण व्यवस्थेला बघता आपण चकीतच होतो.

या मंदिराची महिमा मलाई नाडू येथील १३ धार्मिक स्थळांमधून एक आहे. इसवी सन ८ मध्ये होऊन गेलेले संत कवी नाम्माल्वर पद्मनाभाची स्तुती गायचे. अनंथापुरम मंदिराजवळ राहणारे पंडित विल्वामंगालात्हू स्वमियर यांनी कासरगोड जिल्ह्यात भगवान विष्णूची खुप प्रार्थना केली आणि त्यांचे दर्शन प्राप्त केले. त्यांनी सांगितले की, भगवान विष्णू छोट्या नटखट बालक रूपात आले होते. त्यांनी मूर्ती दुषित केली. यामुळे मंदिरातील पंडित रागावले आणि त्यांनी त्या बालकाचा पाठलाग केला. परंतु बालक अदृश्य झाले. खुप शोधल्यानंतर जेव्हा ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी पुलाया महिलेचा आवाज ऐकला. ती आपल्या पुत्राला म्हणत होती की, ती त्याला अनंथान्कदुत फेकुन देईल. त्या क्षणी पंडितांनी अनंथान्कदु हे शब्द ऐकताच ते आनंदित झाले. त्यानंतर त्यांनी त्या स्त्रिशी बोलून अनंथान्कदु कडे प्रस्थान केले.
तिथे पोहोचल्यानंतर त्या बालकाचा ते शोध घेवू लागले. त्यांनी पाहिले की तो बालक इलुप्पा वृक्षात अंतर्धान पावला. त्यानंतर तो वृक्ष उन्मळून पडला आणि त्या ठिकाणी अनंता सयानाची मूर्ती तयार झाली. परंतु ती मूर्ती आवश्यकतेपेक्षा खुप मोठी झाली. या मूर्तीचे शीर थिरूवाल्लोम येथे, नाभी तिरुअनंतपुरम येथे, आणि चरणकमल थ्रिप्पदापुरम येथे होते. इतकी प्रचंड मोठी मूर्ती होती.

या मूर्तीची लांबी १२ किलोमीटर इतकी झाली हे बघून पंडितांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली आणि त्यांना आपले रूप लहान करण्याची विनंती केली. त्या क्षणी भगवंतांनी स्वतःला तीन पट लहान करून घेतलं. सध्या वर्तमानस्थितीत जी मूर्ती विराजीत आहे, ते हेच रूप आहे. परंतु भगवंत पूर्ण दिसत नव्हते. कारण इलुप्पा वृक्षाची आडकाठी येत होती. पंडनतांनी भगवंतांना थिरूमुक्हम, थिरूवुदल आणि थ्रिप्पदम या तिन्ही भागांना पाहिलं. त्यांनी पद्मनाभ भगवंताना क्षमा मागितली, त्यांनी राइस कांजी आणि उप्पुमंगा खोबऱ्याच्या कवचाच्या आत पुलाया महिलेकडून प्राप्त करून भगवंतांना अर्पण केले.
ज्या स्थळी भगवंतांनी गुरूजींना दर्शन दिले, ते स्थान कुपक्कारा पोट्ठी आणि करूवा पोट्ठी शी संबंधीत आहे. त्यावेळी तिथे शासन करत असलेल्या राजांनी आणि तिथल्या ब्राम्हणांनी सोबत मिळून मंदिराचे निर्माण कार्य केले. पद्मनाभस्वामी मंदिराच्या उत्तर पश्चिमी भागात अनंथान्कदु नागराजा मंदीर आहे. स्वामींची समाधी पद्मनाभ मंदीराच्या बाहेर पश्चिमेला स्थित आहे.

समाधीच्या वरती कृष्ण मंदिर बनलेले आहे. दक्षिण भारतीय शैलीतील या पुरातन व भव्यदिव्य मंदिरात दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तसेच स्थानिक रहिवासी दररोज किमान एकदा तरी दर्शन घेतातच.
कसे पोहचाल
हे मंदिर केरळ राज्याची राजधानी थिरुवअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथे वसलेले आहे व त्रिवेंद्रम हे शहर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी  रेल्वे, विमान व रस्ते मार्गाने जोडलेले आहे. त्यामुळे येथे पोहचणे सहज शक्य आहे.  
मंदिर दर्शनाच्या वेळा व पोशाख
पहाटे ४.३० ते सकाळी ११.३० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८.३० पर्यंत या मंदिरात पुरुषांना फक्त लुंगी व महिलांना साडी हा पोशाख असल्याशिवाय दर्शनास परवानगी मिळत नाही.
काय पहाल
येथे कोवालमचा सुंदर समुद्र किनारा फक्त २० किमीवर आहे. तसेच राजा रविवर्मा आर्ट गॅलरी व प्राणी संग्रहालय तसेच पॅलेस येथे अवश्य भेट द्यावी. तसेच येथून भारताचे शेवटचे टोक कन्याकुमारी हे फक्त ८८ किमी अंतरावर आहे.

कुठे रहाल
त्रिवेंद्रम हे केरळातील सर्वात मोठे शहर असल्याने येथे सर्व दर्जाची हाॅटेल्स उपलब्ध आहेत. मात्र समुद्रकिनारी रहायचे असल्यास  कोवालम येथे मुक्काम करावा.