लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बस स्थानकातून मुलीच्या प्रकरणावरुन गणेश माळी या तरुणाला नातेवाईक अनिल माळी याने मारहाण केली होती. मारहाणीचा वचपा काढण्यासाठी गणेश माळी याने अनिल यास लासलगाव बस स्थानक परिसरात बोलविले आणि अन्य मित्रांच्या मदतीने त्याचे ओम्नी गाडीतून अपहरण करुन त्यास रेल्वे गेट जवळील काटेरी झुडपात नेत मारहाण केली. लासलगाव बस स्थानकातून ओम्नी गाडीतून नेत गाडी मागे त्याचे साथीदार पळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्यानंतर अवघ्या चार तासात लासलगाव पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले.
८ जानेवारी रोजी निफाड तालुक्यातील देवगाव फाटा येथे मुलीच्या प्रकरणात त्या मुलीच्या नातेवाईकांनी एकास मारहाण केली होती. या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी सदर इसमाने एका मुलीचा मोबाईल नंबर असल्याचे भासवत व्हाट्सअप वर तीन दिवस मारहाण करणाऱ्या तरुणाला मेसेज केले आणि आज सकाळी लासलगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलवले. सदर तरुण आणि त्याचा मित्र मोटरसायकल वरून आले होते. लासलगाव बस स्थानकाच्या आवारात उभे असताना मारहाण करणाऱ्या तरुणाचे एका ओमिनी व्हॅन मधून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी अनिल माळी या फिर्यादीच्या जबाबावरून लासलगाव पोलीस ठाण्यात अपहरण व दंगलीचा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात येवला तालुक्यातील संशायित आरोपीसह त्याच्या चार मित्रांना निफाड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. तर तीन जण अद्यापही फरार आहे. याप्रकरणी फरार तिघांचा लासलगाव पोलीस शोध घेत आहे.