मुंबई – माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडल्याने आज मुंबईत होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ईडीने कालच खडसे यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, खडसे यांची प्रकृती बिघडल्याने ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे.
बुधवारी खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीने भोसला जमीन घोटाळयाप्रकरणी अटक केली आहे या अटकेमुळे खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहे. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई करत असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत खडसे आपली भूमिका स्पष्ट करणार होते.
२०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर या प्रकरणी विविध चौकशाही झाल्या. पण, त्यानंतर ईडीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी कारवाई सुरु केली. भोसरी येथील भूखंड हे ३१ कोटी रुपयांचे असतांना ३ कोटी ७ लाख रुपयाला घेण्यात आला, रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचाही या प्रकरणात आरोप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 7, 2021