ज्यांची कविता सामाजिक समतेचा हुंकार ध्वनित करताना दिसते. प्रामुख्याने स्त्रीमुक्तीचा आवाज ज्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी दिसतो. सहज सोप्या शब्दात मनाचे आक्रंदन व्यक्त करणं, हे ज्यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांची कविता माणसाच्या जगण्याच्या विविध स्तरातील अंत:स्वर आहे. ज्या वेदनेला अर्थ देणारी आशयघन कविता त्या सातत्याने लिहितात. आपल्या कवितेतून स्त्रीसंवेदना व्यक्त करतात. त्या म्हणजे कवयित्री प्रा.डॉ.प्रतिभा जाधव.
आजच्या भागात त्यांचा आणि त्यांच्या कवितेचा परिचय आपण करणार आहोत. कवयित्री प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांची कविता म्हणजे अनुभूतीच्या जगण्याचे खंदक फोडून आत्मभानाशी संवाद करीत, स्वत्वाचा शिलालेख काळावर कोरीत जाणारी कविता होय. खरे तर त्यांची कविता म्हणजे शोषक आणि शोषित यांच्या अंत:संघर्षाची कविता आहे. त्यांची कविता अंधार सारून प्रकाशाचा वेध घेणारी उर्जस्वल कविता आहे. त्यांच्या कवितेला स्वतंत्र मूल्यभान आहे. ते भान त्यांनी जाणीवपूर्वक जपले आहे.
ज्यांची कविता अधूनमधून क्षुब्ध व उत्तेजित होत असली तरी संयम आणि शांती ही मूळप्रकृती सोडत नाही.सभोवतालच्या अस्तित्व नाकारलेल्या श्वासांची आर्तता त्यांची कविता सातत्याने आधोरेखीत करतांना दिसते. जीवनातील भयावहकता, सामाजिक विषमतेची दरी कधी मिटणार? हा प्रश्न त्यांच्या चिंतनाचा विषय असल्याने त्यांची कविता वेदनेचा जाळ होऊन भेटत राहते. मानवी मनाच्या तळाशी असलेला न विझणारा विद्वेषाचा जाळ किती दिवस धगधगता राहणार आहे. असे असले तरी प्रस्थापित व्यवस्थेचे काळेकुट्ट ढग आपली रुजू पाहणारी स्वप्न चिरडून टाकत असतांना, भविष्याचा वेध घेणारे त्यांचे मन मात्र खचून जात नाही. याउलट अंधारवाटा तुडवून प्रकाशाचा वेध घेण्याची भाषा त्यांची कविता करतांना दिसते. दुख:चा अंधार पेलून उजेडाच्या दिशेने वाटचाल करण्याचा मूलमंत्र त्यांची कविता देवून जाते. म्हणूनच समाज मनाच्या आतल्या वेदनेची ठसठस मांडणारी त्यांची कविता अधिक ज्वालाग्राही बनते.
प्रा.डॉ. प्रतिभा जाधव यांची कविता जगण्यातील तुटलेपण, एकाकीपण सांधणारी,जोडणारी कविता आहे. त्यांची कविता जितकी विद्रोहाची भाषा करते, तितकीच ती बुध्दाच्या संयम आणि शांतीचा पुरस्कार करते. आंबेडकरी विचारांचं वारं प्यालेली ही कविता मानव मुक्तीचा उदघोष करीत अखिल शोषित,पीडित स्त्रियांचा उद्गार बनू पाहते आहे.
कवयित्री प्रा.डॉ.प्रतिभा सुरेश जाधव हे मराठी साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व. समीक्षक,वक्ता, साहित्यिक, एकपात्री कलाकार, निवेदिका अशा अनेकविध भूमिकांनी त्यांना सातासमुद्रापार पोहोचविले आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत.
नाशिक आकाशवाणीवर त्यांनी काही वर्षे निवेदिका म्हणून काम केले आहेत. दूरदर्शनच्या झी मराठी, मायबोली, झी 24तास,टीवी 9, कलर्स मराठी या वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत. त्या सातत्याने विविध वृत्तपत्रांतून प्रासंगिक लेखांचे लेखन करीत असतात. त्यांचे लेखन विविध दिवाळी अंक, मासिके यातून सातत्याने प्रकाशित होत असते.
दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवरून त्यांचे कथाकथन,कविता,व्याख्याने प्रसारीतझाले आहेत. त्या नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे समन्त्रक म्हणून काम पाहतात.विशेष म्हणजे त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापठाच्या बहिःशाल मंडळाच्या व्याख्यात्या आहेत. त्यांनी आजपर्यंत चार-पाचशे व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या मी जिजाऊबोलतेय.. या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ मॉरिशस येथील महात्मा गांधी ऑडिटोरियम येथे २५ मे २०१६ रोजी संपन्न झाला. तर सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत २४नोव्हेबर २०१८ रोजी ‘मी सावित्री ज्योतिबा फुले…!‘ हा एकपात्री प्रयोग सादर केला.सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल सिटीझन ऑफ इंडिया-2018 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या कार्याची नोंद युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये २०१८ साली केली गेली आहे. त्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.1)काव्यप्रतिभा विविध बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्ष 2) साहित्य सखी महिला मंच, नाशिक यांच्या संस्थापिका-अध्यक्ष 3)’थंडरबोल्ट:एक परिवर्तन’ या राज्यव्यापी सामाजिक संस्थेच्या नाशिक जिल्हाध्यक्षा ४) ‘माणुसकीची शाळा’ या अभिनव अभियानातील कार्यकर्ती –शिक्षिका ५)डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यव्यापी सामाजिक,साहित्यिक संस्थेच्या जिल्हाध्यक्षा ६)’आम्ही लेखिका’ या राज्यव्यापी संस्थेच्या नाशिक जिल्हाध्यक्षा म्हणून काम पाहत असतात. त्यांची प्रकाशित ग्रंथसंपदा अक्षरांचं दान (काव्यसंग्रह) मी अरुणा बोलतेय… (एकपात्री नाटक) काळोखाला दूर सारुन… (ललित लेखसंग्रह) संवाद श्वास माझा…(काव्यसंग्रह) तर अस्वस्थतेची डायरी (ललित लेखसंग्रह), 2000 नंतरच्या निवडक कवितासंग्रहांचा समीक्षाग्रंथ, ‘विचार पेरत जाऊ’ ह्या लेखसंग्रहाचे संपादन ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.आजपर्यंत त्यांच्या विविध साहित्यकृतीला खालीलप्रमाणे पुरस्कार मिळाले आहेत.
मी अरुणा बोलतेय….या पुस्तकास अहमदनगर येथील डॉ.भास्कर हिवाळे राज्य साहित्य पुरस्कार, शब्दगंध साहित्य परिषद,अहमदनगर. अकोला येथील साद बहुद्देशीय संस्थेचा कै.वसंतराव दांदळे राज्य साहित्य पुरस्कार, एल्गार साहित्य सामाजिक परिषद, पुणे यांचा साहित्यवैभव पुरस्कार,‘काळोखाला दूर सारून….‘या पुस्तकास बुलढाणा येथील कुसुमावती भीमराव जाधव राज्यसाहित्य पुरस्कार ,अभिव्यक्ती महिला परिषद, नागपूर यांचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार, मराठी वाङ्मय परिषद, बडोदा यांचा अभिरुची पुरस्कार, कादवा प्रतिष्ठान, दिंडोरी (नाशिक )यांचा गुरुमाऊली राज्य साहित्य पुरस्कार , अंकुर साहित्य संघ, अकोला यांचा राज्य साहित्य पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांचा राज्यसहित्य पुरस्कार, झेप साप्ताहिक,औरंगाबाद यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अकोला येथील शब्दसृष्टी बहुद्देशीय संस्थेचा साहित्यरत्न राज्य वाड;गमयीन पुरस्कार, संवाद श्वास माझा’ या काव्यसंग्रहास सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ,नाशिक यांचा ‘सर्वोदय साहित्य पुरस्कार.
अक्षरांचं दान या काव्यसंग्रहास लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार , नाशिक अखिल भारतीय साहित्य संस्कृती अकादमी,वर्धा यांचा राष्ट्रीय पुरस्कार, येवला येथील पत्रकार संघाचा लोकमान्य टिळक राज्यपुरस्कार, अंकुर साहित्य संघ जि.अकोला यांचा विंदा काव्य राज्य पुरस्कार, एन.डी.एस.टी.सोसायटी , नाशिक जिल्हास्तरीय उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार,समता प्रतिष्ठान ,मालेगावचा उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार, दुसरी राज्य प्रबोधन परिषद,सटाणा,नाशिक उत्कृष्ट साहित्य पुरस्कार.डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांचा वाड;मयीन राज्यपुरस्कार मिळाले आहेत.
कवयित्री प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहेत. त्यात राजमाता राज्यगौरव, मालेगाव, जि. नाशिक,जिव्हाळा राष्ट्रीय पुरस्कार,नाशिक, युवा गौरव सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार,नाशिक.युवाशक्ती समाजप्रबोधन राष्ट्रीय पुरस्कार,नाशिक ,समाजगौरव पुरस्कार,रामदीप साप्ताहिक, वसई,महाराष्ट्र पत्रकार संघ समाजगौरव पुरस्कार ,नाशिक लासलगाव डॉकटर असोसिएशन, ता.निफाड यांचा सावित्री पुरस्कार,महिला सबलीकरण कार्यासाठी वृत्तपत्र लेखक संघटना, नाशिक यांचा गोदारत्न पुरस्कार, कलावंत विचार मंच, नाशिक यांचा कलावंत राज्य पुरस्कार,न्यायिक पत्रकार लढा संघ,चाकण ,जि. पुणे यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य व कलागौरव राज्य पुरस्कार,तरुणाई फौंडेशन, अकोट जि. अकोला येथील साहित्यरत्न,जीवन प्रकाश बहुद्देशीय संस्था, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर यांचा महिला सबलीकरणासाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यपुरस्कार,अंबाई बहुद्देशीय संस्था, लातूर यांचा राज्यस्तरीय ज्ञानतीर्थ पुरस्कार,.कवी विचार मंच, शेगाव यांचा ‘रणरागिणी राज्यपुरस्कार, यवतमाळ येथील विश्वशांतिदुत बहुद्देशीय संस्थेचा विश्वशांतिदुत राज्य पुरस्कार,अक्षरोदय साहित्य मंडळ,नांदेड यांचा महिला गौरव पुरस्कार पुरस्कार,पुणे येथील खांदेश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला,क्रीडामंचचा कस्तुरी गौरव राज्य पुरस्कार, महाराष्ट्रातील विविध राज्यसाहित्य संमेलनामध्ये त्यांचा परिसंवादात सहभाग असतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!