वाराणसी (उत्तर प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणाऱ्या श्री काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तब्बल ३३ महिन्यांनंतर हे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे काशी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे. तसेच दि. १३ डिसेंबर रोजी मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचे होणारे उद्घाटन अलौकिक, अद्भुत आणि अकल्पनीय असेल. या सोहळ्यानिमित्त देशभऱात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा प्रकल्प नक्की काय आहे आणि या धामच्या लोकार्पणाचे महत्त्व काय हे आता जाणून घेऊ..
– औरंगजेबाच्या आदेशानंतर १६६९ मध्ये मुघल सैन्याने विश्वेश्वराचे मंदिर पाडले. स्वयंभू ज्योतिर्लिंगाचे कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून मंदिराच्या महंताने शिवलिंगासह ज्ञानवापी कुंडात उडी घेतली. हल्ल्यादरम्यान, मुघल सैन्याने मंदिराबाहेर स्थापित केलेली नंदीची भव्य मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सैन्याच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना नंदीची मूर्ती फोडता आली नाही. विश्वनाथ मंदिर परिसरापासून दूर असलेली ज्ञानवापी विहीर आणि विशाल नंदी यांचा पुन्हा एकदा विश्वनाथ मंदिर परिसरात समावेश करण्यात आला आहे.
– काशी विश्वनाथ धाम उद्घाटन सोहळ्यात शंकराचार्यांसह २५१ संत सहभागी होणार आहेत. ‘न भूतो न भविष्यति’ या धर्तीवर काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी सनातन धर्मातील सर्व संप्रदाय एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: देशातील सर्व ज्येष्ठ – श्रेष्ठ संतांना फोन करून निमंत्रित करत आहेत.
– संतांचे आगमन उद्यापासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती, महंत नृत्य गोपाल दास, अवधेशानंद महाराज, रामभद्राचार्य महाराज, महंत कमलनयन दास, रामकमल दास वेदांती महाराज, साध्वी ऋतंभरा यांच्यासह अनेक संत देशभरातून येणार आहेत.
– श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन कार्यक्रमाला ऐतिहासिक बनवण्यासाठी काशीतील सात लाख घरांमध्ये लाडू वाटण्याची तयारी सुरू आहे. त्याच्या तयारीसाठी १४ हजार किलो बेसन, ७ हजार किलो साखर आणि ७ हजार किलो तुपाची व्यवस्था करण्यात आली आहे. लाडू बनवण्यासाठी दहा जण कामाला लागले आहेत. सुमारे ६०० कामगार रात्रंदिवस काम करत आहेत. या कामासाठी मिठाईवाले रात्रंदिवस झटत आहेत. पुरुष आणि स्त्रिया दोघेही पॅकिंग करण्यासाठी गुंतले आहेत. प्रत्येक पाकिटात दोन लाडू ठेवले जातील.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करणार असताना काशीमध्ये दीपावलीसारखा महोत्सव पाहायला मिळेल. कारण काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानिमित्त लोक घरोघरी दिवे लावून भगवान शिवाचे आवाहन करतील. धामच्या उद्घाटनानिमित्त १२ ते १४ डिसेंबर असा तीन दिवसीय शिव दीपोत्सव साजरा होणार आहे. याकरिता शहरापासून गावापर्यंत घराघरात तयारी सुरू आहे. यासोबतच सर्व मंदिरे, शहरातील रस्ते, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणे लेझर शो, फटाके व दिव्यांनी उजळून निघणार आहेत. बाबांच्या धाम उद्घाटनासाठी शिवनगरीतील भाविक उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत.