इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
कारंजा लाड
गुरुदेव दत्तांचा दुसरा अवतार : अत्रिवरद
अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता ‘अत्रिवरद’ या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले. अत्रींऋषींनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि आश्चर्यचकित होऊन विचारले, “मी फक्त एकाच परमात्म्याची आराधना केली होती. कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे जेणेकरून माझ्या चित्तास संतोष प्राप्त होईल.” तेव्हा त्रिदेव म्हणाले, “आपण ज्याचे लक्ष्य केले आहे त्या प्रमाणेच आम्ही आहोत. आम्ही तीन रूपांत दिसतो; परंतु तत्वतः आम्ही एकच आहोत.” असे म्हणून तिघेही एकरूप झाले.
आता अत्री ऋषींच्या समोर परमेश्वराचे सोन्यासारखे तेजःपूंज रूप दिसत होते. त्यांना तीन मुखे होती, सहा हात होते. सहा हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, पद्म, कमंडलू अशी आयुधे होती. ह्या सुंदर अवतारातील तिनही श्रीमुखांवर मंद हास्य होते. देवाने या रूपात अत्रिऋषिंना “तुझी ईच्छा पूर्ण होईल” असे वरदान दिले म्हणूनच या अवतारला ‘अत्रिवरद’ म्हणून ओळखले जाते. हा अवतार कार्तिक वद्य प्रतिपदा, रोहिणी नक्षत्रावर, गुरुवारी, पहिल्या प्रहरी आणि पहिला मुहूर्तावर झाला.
जन्म:- कार्तिक कृष्ण प्रतिपदा
श्री क्षेत्र कारंजा मंदिर
आज आपण श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र कारंजा या सुप्रसिद्ध दत्त स्थानाची माहिती घेणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
वाशिम जवळचे कारंजा (दत्त) हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे. आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झालातो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता. त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते. हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्रीनृसिंहसरस्वती स्वामींची मूर्ती आहे. इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वतीस्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे. श्री वासुदेवानंदसरस्वती व श्री ब्रह्मानंदसरस्वतीस्वामी यांच्या प्रयत्नाने श्रीगुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्व दत्तभक्तांना पटलेली दिसते. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-यवतमाळ या रेल्वेरस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे. साठ सत्तर हजार लोकसंख्येच्या या गावी चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय झाले आहे.
प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. करंजमुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केल्याची कथा आहे. या क्षेत्रात गंगा व यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून येथून पुढे बेंबळा नदी वाहते. याच क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवीचेही वास्तव्य असल्याचे सांगतात. करंजमुनींच्या प्रभावाने गरुडापासून शेषनागास संरक्षण येथेच मिळाल्यामुळे या क्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव आहे. येथील नागेश्वराच्या पूजनामुळे कधीही विषबाधा होत नाही असे सांगतात.
याच करंजनगरीत श्री नृसिंहसरस्वती शके १३००च्या सुमारास जन्मास आले. श्रीगुरुंच्या जन्मस्थानाचा शोध अलीकडेच लागला. सन १९०५ मध्ये श्री वासुदेवानंदसरस्वतींनी या नगरीत वास्तव्य श्री राम मंदिरात केले होते. सध्याच्या गुरुमंदिराशेजारी घुडे यांचा वाडा आहे. बाळकृष्ण श्रीधर घुडे यांनी नगरनाईक काळे यांच्याकडून हा वाडा सन १८८० च्या सुमारास विकत घेतला. काळे यांचे वंशज सध्या काशीस असतात. यांपैकी कोणालाच श्रीगुरूंच्या जन्मस्थानाची कल्पना नव्हती. हा वाडा चार मजली, भव्य व प्रेक्षणीय आहे.
जमिनीखाली तीन मजली भुयार आहे. भिंतीची रुंदी चार फुटांपासून सहा फुटांपर्यंत आहे. दुसऱ्या मजल्यावर श्रीगुरुंच्या जन्मस्थानाची जागा आहे. या वाड्याच्या शेजारच्या जुन्या माडीवर एक रात्र राहण्याचा योग आला असता श्री वासुदेवानंदांना श्रीगुरुंच्या वास्तव्याचा अंदाज आला. बापूसाहेब घुडे यांच्या वाड्यातील भिंतीत एक नृसिंहस्थान असून तेथे संन्यासी वेषातल्या व्यक्तीचा अदृश्य निवास असल्याचे त्यांच्या कानी आले. काहीजणांना या यतीचे दर्शन झाले होते. ‘माझे वास्तव्य येथेच आहे’ असा दृष्टांतही त्यांना झाला. अण्णासाहेब पटवर्धन यांनीही या कामी लक्ष घातले.
श्रीक्षेत्र कारंजा गुरुमंदिर
आजपासून बरोबर शंभर वर्षां पूर्वी सन १९२०-२१मध्ये श्रीलीलादत्त उर्फ ब्रह्मीभूत ब्रह्मानंदसरस्वती यांनाही या स्थानाची ओढ लागून येथे गुरुमंदिर उभारावे अशी प्रेरणा झाली. त्यांना तेथे स्थापन करण्यासाठी, निर्गुण पादुकाही मिळाल्या. श्रीगुरुंचे मंदिर, त्यांची मूर्ती, त्यांच्या पादुका यांची सिद्धता होऊन सन १९३४च्या सुमारास आणखी एका या जुन्या दत्तक्षेत्राची नव्याने निर्मिती झाली. श्री दीक्षितस्वामींनीही या कामी बरेच लक्ष घातले. दत्तात्रेय, चिंतामणी गणपती, काशीविश्र्वेश्वर, गुरुपादुका इत्यादींच्या दर्शनाची सोय झाली. गुरुमंदिरातील मूर्ती अतिशय रम्य व बालसंन्यासी रुपातली आहे. येथेही श्री नृसिंहसरस्वतींचा वा दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेकदा साधकांना झालेला आहे.
श्रीगुरुंच्या मंदिरापासून जवळच कामाक्षी व एकवीरा यांची मंदिरे आहेत. गावाच्या दक्षिणेस एक मैलाच्या परिसरात ऋषितलाव असून कमळांनी व ऑस्ट्रेलियन पानकोंबड्यांनी हा शोभिवंत दिसतो. कामाक्षी देवीच्या कृपाप्रसादामुळे करंज ऋषींनी या तलावाची निर्मिती केल्याची कथा ‘करंज-माहात्म्य’ या नावाच्या ग्रंथात आहे. याच ठिकाणी बेंबळा नदीचा उगम दत्तमंदिराजवळ आहे.
अभूतपूर्व कार्य
करंज ऋषींच्या पवित्र कार्याने पुनित झालेली ही कारंज नगरी भगवान दत्तात्रेयाचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असून हे स्थान परमपूज्य थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती येथे येईपर्यंत कारंजावासीयांना अज्ञातच होते. स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रेयाचा व्दितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान आहे असे तत्कालीन प. पू. ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले. प. पू. ब्रम्हानंदांनी ‘श्रीं’ ची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली. ती मूर्ती एप्रिल मध्ये कारंजास आणण्यात आली. मंदिर तयार झालेलेच होते. त्यामुळे चैत्र वद्य व्दितीयेला २१ एप्रिल १९३४ रोजी मुर्तीची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्व आहे. त्या पादुका काशी क्षेत्रातून प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी कारंजास आणल्या व विधीवत त्यांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात केली. या पादुका सकाळी गंधलेपनाकरीता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यावर देव्हा-यात ठेवल्या जातात. या पादुकांना अत्तर, केशर यांचे गंधलेपन नियमीतपणे होत असते. तसेच या संस्थेचा कार्यक्रम कशा प्रकारचा असावा हे प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी ठरवून दिले आहे.
सकाळी साडेपाचला काकड आरती, त्यानंतर महाराजांना लघुरुद्र व पंचोपचार पूजा, त्यानंतर सत्यदत्त पूजा, सायं पुजा, पंचपदी, रात्री साडे आठला आरती अन् त्यानंतर अष्टके व शंखोवक होऊन इतर काही कार्यक्रम नसल्यास शेजारती होते आणि नंतर कपाट बंद होते. कुठल्याही परिस्थीतीत कपाटे दुस-या दिवशीच्या काकड आरती पर्यंत उघडले जात नाही.
या ठिकाणच्या पुजा-याला त्रिकाल स्नान करुन गाभा-यात जावे लागते. तेही त्यांनी घरुन स्नान करुन आलेले चालत नाही. आचारी व पुजारी यांच्याकरिता स्वतंत्र स्नानगृह आहे. तेथेच स्नान करुन नंतर ते आपआपल्या कामी लागतात. पुजा-याशिवाय कोणालाही ‘श्रीं’ च्या गर्भगृहात प्रवेश नाही. हे ठिकाण अतिशय जागृत आहे. याचा प्रत्यय विविध भक्तांस वारंवार येत असतो. या क्षेत्री श्रींचे मंदिरच नव्हे तर उपासना पद्धती व दिनक्रमही श्री ब्रह्मनंद स्वामींनी ठरवून दिला. हे महान कार्य दत्तभकांसाठी त्यांनी केले आपण त्यांचे ऋण विसरून चालणार नाही.
जन्मस्थान व मुर्तीचा इतिहास
शके १८२७ भाद्रपद व वद्य ७ या दिवशी श्रेष्ठ दत्तभक्त श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंदसरस्वतीस्वामी संचार करीत करीत कारंजा क्षेत्री आले. तेथील हनुमान मंदिरात त्यांचा मुक्काम दोन दिवस होता. श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म कारंजा येथे कोणत्या स्थानी झाला याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक तपास करून प. प. वासुदेवानंदसरस्वतींस्वामींनी एक विशिष्ट ठिकाणच महाराजांचे जन्मस्थान आहे असे निश्चित केले. त्याप्रमाणे ती जागा विकत घेऊन तेथे श्रींचे मंदिर बांधावे असे ठरले.
श्री नृसिहसरस्वती महाराज
मंदिर बांधण्याचे काम पूर्णावस्थेला आले. त्यात श्री नृसिंहसरस्वतींची मूर्ती स्थापन करण्याची वेळ समीप आली. परंतु श्रीगुरूंची प्रतिमा कशी तयार करावयाची हा प्रश्न होता. ते काम त्यांचे शिष्य व भक्त श्री. रा. बा. धुरंधर (मुंबई स्कूल ऑफ आर्टसचे मुख्याध्यापक) यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन प्राचार्य श्री. सालोमनसाहेब यांचा व श्री ब्रह्मानंदस्वामी यांचा परिचय असल्यामुळे त्यांनीही स्वयंस्फूर्तीने मीही एक चित्र काढतो असे स्वामींना सांगितले. अशा प्रकारे श्री ब्रह्मानंदस्वामींच्या अनुज्ञेने उपरिनिर्दिष्ट दोघांनीही श्रींचे चित्र काढण्याचे ठरविले. आश्चर्याची गोष्ट अशी की, ती दोन्ही चित्रे अगदी तंतोतंत एकाच नमुन्याची होती. श्रींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झालेले ते दोन्ही चित्रकार धन्य होत! ज्यांच्या चित्रकलाचातुर्याने व नैपुण्याने सर्वसाधारण जनतेलासुद्धा श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे!
श्रींची प्रतिष्ठापना झाल्या दिवसापासून श्रींची नित्य पूजाअर्चा, नैवेद्य वगैरेसंबंधीची व्यवस्था भक्तमंडळींनी स्वखुषीने दिलेल्या द्रव्यसाहाय्यावर चालू होती. आश्चर्याची आणि अभिमानाची गोष्ट ही की, वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांची प्रथम द्वितीय आणि तृतीय फेरी पूर्ण झाली आहे. आता १५१ रुपयांच्या पूजेचा एकही दिवस रिकामा नाही व पुढे चौथी फेरी सुरू करण्याचा विचार नाही. कारण दररोज इतके अभिषेक होणे शक्य नाही. श्रीअन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने आरंभिलेली ही योजना श्री ब्रह्मानंदसरस्वतींच्या अविरत व अनलस प्रयत्नाने यशस्वी झाली. ह्या सफलतेचे सर्व श्रेय प्रिय भक्त श्री ब्रह्मानंदसरस्वती यांचेवर असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या कृपादृष्टीलाच देणे उचित आहे.
श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा संस्थानचे दैनिक व वार्षिक कार्यक्रम
सकाळी ५:०० ते ५:३० काकड आरती ८:०० ते ८:३० गंध लेपन (निर्गुण पादुकांस) ८:३० ते ११:०० पूजा नंतर नैवेद्य. आरती. १२:३० पर्यंत प्रसाद भोजन. सायंकाळी ७:०० ते ९:०० पूजा ७:३० ते ८:३० संगीत गायन नंतर महाआरती, शंखोदकसिंचन व शेजारती होऊन ९:३० चे सुमारास मंदिर बंद करण्यात येते.
येथे यात्रेकरुंकरिता धर्मशाळा आहे. शिवाय गुरुचरित्र सप्ताह करण्याच्या इच्छेने येणारास मंदिरात १ वेळ भोजन मिळते. येथे दार गुरुवारी पालखी काढतात. तसेच श्री दत्तात्रेयाचे १६ अवतार (जयंती) अश्या एकूण १६ जयंत्याच्या प्रत्येक तिथीला पालखी काढतात. पालखी सर्व गावातून ठराविक मार्गाने मिरवतात. ठिकठिकाणी भक्त व ग्रामस्थ घरोघरी पालखी मार्गात औक्षण व पूजा करतात.
या क्षेत्री असे जावे
वाशीम, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० कि. मी. अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे. मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर उतरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते. इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
संपर्क: श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान. श्री क्षेत्र कारंजा, जिल्हा वाशीम – ४४४१०५.
गुरुमंदिर कारंजा फोन-(०७२५६) २२४७५५, २२२४५५, २२३३५५