इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील, असे विधान अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला असून अमित शाह आणि भाजपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कदाचित अमित शाहांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटक मध्ये भाजपला फटका बसू शकतो.
याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेरडल येथील सभेत बोलताना कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू होईल, तसेच राज्यात दंगली होतील असा दावा केला होता. तसेच राजकीय स्थैर्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. याबाबत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. एखाद्या सामान्य माणसाने असे केले असते तर त्याला अटक झाली असती. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय दंगली होतील हे केंद्रीय गृहमंत्री सांगू शकत नाहीत.
आता अमित शाह आणि भाजपाविरोधात बंगळुरुतील हाय कमांड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली. त्यामुळे निवडणुकीत कोण काय बोलेल आणि कोणाविरुद्ध तक्रार दाखल होईल हे सांगता येत नाही, परंतु राजकीय नेत्यांना आपण काय बोलतो याचे भान नसते.
Karnataka Election HM Amit Shah Statement BJP Seats