मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. यात महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील ७ एफएम ट्रान्समिटर्सचा समावेश आहे. या उद्घाटनामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळाली आहे.
देशात एफएम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा आणि वाशिम असे विदर्भात एकूण 4 एफएम ट्रान्समीटर चे उद्घाटन आज झाले. हिंगोली वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे निती आयोगाकडून आकांक्षीत जिल्हा म्हणून जाहीर केले आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा हे नक्षल प्रभावित तालुके आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील सटाणा हा तालुका आदिवासीबहुल आणि गुजरात सीमेलगत आहे.
वाशिम येथे नगरपरिषद परिसर, सिविल लाईन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये खासदार भावना गवळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. अहेरी येथील तहसील कार्यालयाच्या मागे असणाऱ्या एफएम टॉवर जवळ होणाऱ्या कार्यक्रमात गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते. सिरोंचा येथे देखील एफएम ट्रान्समिटर्सचे कार्यक्रम झाला. यावेळी अशोक नेते हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात अचलपूर येथे दूरदर्शन टावर जवळ या एफएम ट्रान्समीटर चा लोकार्पण सोहळा झाला. हिंगोली येथील रेल्वे पुलाजवळ असणाऱ्या एफएम ट्रान्समीटर च्या कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नंदुरबार येथील रोडाई माता रोड जवळील एफएम ट्रान्समीट जवळ होणाऱ्या कार्यक्रमात खासदार हीना गावित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या या विस्तारामुळे, ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हीटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून सुमारे 35,000 चौरस किमी क्षेत्र विस्तारले जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात रेडिओ बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. मोठ्या प्रमाणात श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या या माध्यमाच्या अनोख्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला, जो आता लवकरच 100 व्या भागाचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.
Inauguration of 91 FM transmitters will revolutionise the radio industry in India. https://t.co/wYkBbxGHqT
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2023
PM Narendra Modi Launch 91 FM Transmitters