इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -७)
वनवासातील पहिला मुक्काम
|| श्रृंगवेरपुर ||
रामायणात श्रृंगवेरपुर या स्थानाचे खूप महत्व आहे.अयोध्ये पासून ८० किमी अंतरावर आणि प्रयागराज पासून लखनौ रोडवर ४५ किमी अंतरावर गंगेच्या काठावर हे प्राचीन धार्मिक स्थान आहे. वाल्मीकि रामायणातील अयोध्याकाण्ड या भागात ‘श्रृंगवेरपुर’चा उल्लेख आहे.
वनवासाला जातांना प्रभु श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी पहिला मुक्काम येथे केला होता. येथूनच श्रीराम , लक्ष्मण , सीता यांनी गंगा नदी पार केली होती आणि येथूनच श्रीरामने दशरथ राजाचे महामंत्री सुमंत यांना अयोध्येला परत पाठविले होते. भरत जेव्हा श्रीरामाला भेटायला चित्रकूट येथे गेले होते तेव्हा ते देखील श्रृंगवेरपुर येथे आले होते.
रामायणातील अयोध्याकाण्ड मध्येही श्रीराम गंगेच्या काठावरील श्रृंगवेरपुर येथे आले होते त्याचे वर्णन आहे. येथेच श्रीराम शीशम वृक्षा खाली बसले होते. रामायणात या वृक्षाचा ‘इंगुदी’ किंवा ‘हिंगोटी’ असा उल्लेख केलेला आहे. विशेष म्हणजे आजही तो शीशम वृक्ष येथे पहायला मिळतो. वनवासाला जाताना श्रीराम, सीता ,आणि लक्ष्मण येथे रात्रभर राहिले असल्याचा उल्लेख वाल्मीकि रामायणा प्रमाणेच अध्यात्मरामायण, कालिदासचे रघुवंश, भवभुतीचे उत्तररामायण आणि तुलसीदासजीच्या रामचरितमानस या ग्रंथांत केलेले आहे.
महाभारतात ‘श्रृंगवेरपुर’ला तीर्थरूप म्हटले आहे. अयोध्ये पासून हे ठिकाण ८० किमी अंतरावर एका लहानशा टेकडीवर वसलेल आहे. येथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता एक रात्र राहिले त्या स्थानाला ‘रामचौरा’ असे म्हणतात. हल्लीच्या ‘कुरई’ नावाच्या गावात हे ठिकाण आहे.
रामायण काळात श्रृंगवेरपुर ही निषादराज गुहा याची राजधानी होती. या राज्यात मच्छीमार रहात असत. अयोध्येहून वनवासाला निघालेले श्रीराम, सीता, लक्ष्मण जेव्हा येथे आले तेव्हा त्यांना समुद्रासारखी विशाल गंगा नदी पार करण्यासाठी नावेची गरज होती परंतु एकही नावाडी त्यांना आपल्या नावेत बसवायला तयार नव्हता.
यामागे एक कारण होते. श्रीरामाच्या चरण स्पर्शामुळे शिळा असलेल्या अहिल्येचे स्त्री मध्ये रूपान्तर झाले होते ही गोष्ट या नावाड्यांना माहित असल्यामुळे त्यांना भीती वाटत होती की रामाच्या स्पर्शाने आपल्या नावेचेही एखाद्या स्त्री मध्ये रूपान्तर झाले तर आपल्या पोटासाठी पैसे मिळवून देणारी नाव नष्ट होईल. यामुळे कुणीही नावाडी श्रीरामाना आपल्या नावेत घेईनात. श्रीराम त्यांना समजावून सांगत असतांना मच्छीमारांचा राजा निषादराज गुहा आपल्या प्रमुख मंत्र्यासह तेथे आला. निषादराज गुहा श्रीरामाचा बाल सखा होता असेही सांगितले जाते.
भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी तो तेथे आला. श्रीरामाला भेट देण्यासाठी त्याने फळं आणि कंदमुळं आणली होती.
निषादराज गुहा याने श्रीराम,सीता आणि लक्ष्मण यांना आपल्यानगरात येवून आपल्या महालात विश्रांती घेण्याची विनंती केली पण प्रभु रामचंद्रानी सांगितले, ” निषादराज , मी वचनबद्ध आहे. मी आता वनवासाला निघालो आहे. त्यामुळे आता मी कोणत्याही नगरात वा महालात जावू व राहू शकणार नाही.
मित्र, निषादराज वडिलांच्या आज्ञेमुळे मी १४ वर्षे ॠषि मुनीप्रमाणे वनात राहून वनवासी जीवन जगणार आहे. हे ऐकल्यावर निषादराज अत्यंत दुःख: झाले त्यांनी शीशम नावाच्या वृक्षखाली कुश आणि कोवळी पाने यांची शय्या श्रीरामासाठी तयार केली.त्या शय्येवर श्रीराम विश्रांतीसाठी पहुडले. श्रीरामाना असं झाडाखाली झोपलेलं पाहून निषादराज लक्ष्मणाला म्हणाला,” विधिलिखित किती विचित्र असतं पहा. भगवान श्रीराम महालांत शोभिवंत पलंगावर रात्री निवांत झोपत असतील पण त्यांना आज असं जमिनीवर झोपावं लागत आहे. लोक म्हणतात ते खरं आहे , माणसाच्या नशिबात जे विधिलिखित असतं तसचं घडतं!”
दुसर्या दिवशी निषादराजाने श्रीरामाचे चरण धुतले आणि तो स्वत: नावेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना नावेत बसवून गंगा नदी पार करून दुसर्या किनार्यावर पोहचविले. या प्रसंगामुळे या भागाला ‘रामचौरा’ असे म्हणतात. श्रीराम, सीता, आणि लक्ष्मण यांच्या प्रतिमा असलेले एक लहानसे मंदिर येथे आहे.
श्रृंगवेरपुर येथे दोन रस्त्यांच्या दुभाजकावर निषादराज गुहा यांची भव्य मूर्ती आहे. येथे जवळच एक बोर्डावर ‘श्रीराम वन गमन मार्ग’ तसेच त्याखाली रामसैया ३ किमी आणि श्रृंगवेरपुर असे लिहिलेले आहे.
श्रृंगवेरपुरचे आणखी एक महत्व सांगितले जाते. ते असे, श्रीरामाच्या जन्मापूर्वी येथे श्रृंगी नावाच्या ऋषिंचा आश्रम होता. या श्रृंगी ऋषींनीच दशरथ राजाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी पुत्र कामेष्टि यज्ञ करण्याचे सांगितले. त्यानुसार पुत्रकामेष्टि यज्ञ केल्यावर दशरथ राजाला श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र प्राप्त झाले. दशरथ राजाने प्रसन्न होवून श्रृंगी ऋषीला दक्षिणा मागण्यास सांगितले. श्रृंगी ऋषीने दशरथ राजाची कन्या पत्नी म्हणून मागितली. दशरथ राजाला श्रीराम ,लक्ष्मण ,भरत आणि शत्रुघ्न हे चार पुत्र होण्या आधी शांता नावाची कन्या झालेली होती. ती त्याने एका मित्र राजाला दत्तक दिलेली होती. तिचे नाव शांता होते. दशरथ राजाची हीच कन्या पुढे श्रृंगी ऋषिची पत्नी झाली.
श्रृंगवेरपुर येथे गंगेच्या काठी उंच टेकडीवर अनेक पायर्या असलेले भव्य मंदिर आहे. या मंदिरात श्रृंगी ऋषि, त्यांची पत्नी शांता देवी आणि शीतला देवी यांच्या मूर्ती आहेत. येथून जवळच निषादराज गुहा याचा उत्खाननात सापडलेला किल्ला आहे. पुरातत्व विभागाने हे उत्खनन केले आहे. श्रृंगवेरपुर येथे एक दिवस थांबुन श्रीराम, सीता आणि लक्ष्मण गंगा नदी पार करुन प्रयागराज येथे गेले.
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
ramayan yatra shrungverpur place importance by vijay golesar