इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक भाजप सरकारमधील एका मंत्र्याचे वक्तव्य मीडियात लीक झाल्यानंतर तेथे खळबळ उडाली आहे. यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही अस्वस्थ झाले आहेत. सीएम बोम्मई यांनीही आज हे कमेंट अस्सल असल्याचं मान्य केलं आहे, पण ती चुकीच्या संदर्भात घेतली गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकचे कायदा मंत्री जेसी मधुस्वामी एका ऑडिओ क्लिपमध्ये आम्ही सरकार चालवत नाही, आम्ही फक्त ते सांभाळत आहोत, असे सांगत आहेत. यामुळे भाजप नेतृत्व आणि पक्षाची धारणा अधोरेखित होत असल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे.
६२ वर्षीय बोम्मई यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच हे वक्तव्य व्हायरल झाले आहे. पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. बोम्मई यांच्या कामावर भाजप खूश नसल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. तथापि, दोन दिवसांपूर्वी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, बोम्मई असतानाच पक्ष पुन्हा एकदा येथे सरकार स्थापन करेल. बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोम्मई यांनी गेल्यावर्षी शपथ घेतली होती.
मुख्यमंत्र्यांची खुर्ची पूर्णपणे सुरक्षित असल्याचे येडियुरप्पा यांनीही म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह अचानक कर्नाटक दौऱ्यावर पोहोचले होते. यानंतर बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदाचा निरोप दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कायदामंत्र्यांचा ऑडिओ लीक झाल्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीही सर्व काही ठीक असून कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. मात्र, आणखी एका ज्येष्ठ मंत्र्याने कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी जनतेशी बोलून प्रकरण सोडवू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायदामंत्र्यांच्या वक्तव्यावर बोम्मई म्हणाले की, चुकीच्या संदर्भात त्यांचे म्हणणे घेतले गेले आहे. बँकांनी केलेल्या व्याजाच्या मागणीबाबत ही टिप्पणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Karnataka BJP Government Minister Audio Clip Viral