दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कादवा सहकारी साखर कारखान्याने 80 दिवसात तब्बल २ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. ऊस बिलापोटी कारखान्याने अगोदर रू.1885 आणि आता रू.155 असे एकूण रु. 2040 ऊस उत्पादकांचे खाती वर्ग केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. गेल्या 80 दिवसात दोन लाख मे.टन ऊस गाळप करण्यात आले आहे. कारखान्याला 12.08% साखर उतारा मिळाला आहे. सरासरी 10.73% साखर उतारा मिळत 2,12,050 क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.
साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने साखर विक्रीस उठाव नाही. त्यातच जुनी साखरही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. नुकतीच कादवाने 27000 क्विंटल साखर निर्यात केली आहे. ऊसाच्या बीलापोटी सुरुवातीला रू.1885 अदा करण्यात आले होते. आता रू.155 बँक खाती वर्ग केले आहे. एकूण 2040 रुपये शेतकऱ्यांना अदा झाले आहेत.
इथेनॉल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर सदर प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न कारखान्याकडून सुरू आहेत. कादवा कारखान्याने कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त ऊस तोड सुरू आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे, व्हा.चेअरमन उत्तम भालेराव यांनी केले आहे. यावेळी सर्व संचालक,कार्यकारी संचालक हेमंत माने,सर्व अधिकारी उपस्थित होते.