नवी दिल्ली – कॅरेबियाई देशांपैकी एक असलेल्या हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांची काही गुंडांनी घरात घुसून हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अंतरिम पंतप्रधान क्लाउडी जोसेफ यांनी जोवेनल मोइस यांच्या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घरात घुसून काही गुंडांनी बुधवारी (७ जुलै) त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी आणि देशाच्या पहिल्या महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांच्या खासगी निवासस्थानी जाऊन काही अज्ञान लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. एका कमांडोच्या गटाने ही हत्या घडवून आणल्याचे बोलले जात आहे. संशयितांकडे परदेशी शस्त्र होती.
मोइस यांची हत्या अमानवीय आणि निर्घृण असल्याचे सांगत अंतरिम पंतप्रधान क्लाउडी जोसेफ यांनी कठोर शब्दात निंदा केली आहे. लोकांनी संयम बाळगावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेने देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, काही लोक सरकार उखडून टाकण्याचे तसेच आपली हत्या करण्याचे प्रयत्न करत असल्याची शंका राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. असा संशय असणार्या काही संशयितांना फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये हा कट रचण्यात आल्याचा दावा मोइस यांनी त्या वेळी केला होता. अटक झालेल्यांमध्ये एक न्यायाधीश आणि एक पोलिस महानिरीक्षक असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु हत्या होण्याच्या शंकेचे पुरावे किंवा संपूर्ण माहिती त्यांनी समोर ठेवले नव्हते.
https://twitter.com/ajplus/status/1412758639631290369