जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजस्थानमध्ये चिमुरडीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह वीट भट्टीत जाळल्याचा प्रकार ताजा असतानाच जिल्ह्यातील अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने या चिमुरडीचा मृतदेह जनावरांच्या गोठ्यात असलेल्या चाऱ्यामध्ये लपवला. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेले घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे.
१ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित स्वप्नील विनोद पाटील याला ३ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. अटक केल्यानंतर संशयिताची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संशयिताला ५० हून अधिक पोलीसांच्या बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणीसाठी गोंडगाव येथे नेत असतांना, संशयिताला आमच्या हवाली करा, म्हणत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यात संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमाव यांच्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
गोठ्यात दुर्गंधी येऊ लागल्याने घटना उघडकीस
संशयिताने मुलीवर लैगिंक अत्याचार करुन मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवला. दोन दिवसांनंतर गोठ्यात दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निलला अटक केली. याप्रकरणाचा तपास भडगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
jalgaon crime minor girl rape murder bhadgaon
Gondgaon Rural District Posco Sexual Abuse