विशेष प्रतिनिधी, मुंबई
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्यांमध्ये मतभेद होते. एका आठवड्याचा ब्रेक घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करावी, असे मत मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत अनेक पदाधिकार्यांचे होते. परंतु स्पर्धेला अनिश्चित काळासाठी स्थगित करावे यावर सचिव जय शाह अडलेले होते. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्यावर याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडूनच दुबईमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणे जवळपास निश्चित झाले आहे.
”तुम्ही स्थानिक आठ संघांची स्पर्धा आयोजित करू शकत नाहीयेत, तेव्हा १६ संघांची विश्वचषक स्पर्धा कशी आयोजित करू शकाल,” असा प्रश्न निश्चितच आयसीसी आणि परदेशी क्रिकेट मंडळ उपस्थित करू शकतील. भारतात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही क्रिकेट मंडळ आपले क्रिकेट संघ भारतात पाठविणार नाही. आयपीएल स्थगित करण्याच्या निर्णयामुळे आयसीसीच्या हातात आयते कोलित सापडले आहे. आयसीसीने आधीच युएईचा पर्याय ठेवला होता. जूनमध्ये आयसीसीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
१५ संघ बाहेरून येणार
आयपीएलमध्ये ३० टक्के परदेशी खेळाडू आहेत. पण टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताला सोडून १५ संघ भारताबाहेरून येणार आहेत. त्यांचे व्यवस्थापन करणे अवघड काम आहे. आयपीएलमध्ये आठ संघांच्या फ्रँचाइजी भारतीय आहेत. त्या काळात भारतात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाल्यास इतर देशांचे सरकार क्रिकेट संघांना पाठविण्यास नकार देतील.
संघांच्या सुरक्षेला प्राधान्य
भारतात कोरोनामुळे दररोज ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे बहुतांश क्रिकेट मंडळ चिंतीत आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी क्रिकेट संघांच्या सुरक्षेला प्राधान्य देईल. भारतातील परिस्थिती पाहता कोणताही परदेशी संघ पुढील सहा महिन्यात भारतात येणार नाही, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुबईतच स्पर्धेचे आयोजन करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.