मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रिमीयर लिग आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील पुढील सर्व साखळी सामने आता निर्णायक ठरणार आहेत. प्ले-अॉफच्या दृष्टीने या सामन्यांचे महत्त्व अधिक आहे. पण सध्यस्थितीत गुजरात आणि चेन्नईचे संघ मजबुत स्थितीत आहेत. तर, दिल्ली संघाचे आव्हान संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
आयपीएलच्या सामन्यांनी यावर्षी शेवटच्या क्षणाल अनेक धक्के दिले. त्यानुसार प्ले-अॉफमध्ये पोहोचण्याच्या स्पर्धेतही अनेक धक्के बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण सध्या गुजरात आणि चेन्नई हे दोन्ही संघ पॉईंट टेबलमध्ये आघाडीवर आहेत. पण इतर संघांची कसरत अद्याप संपलेली नाही. गुजरातने ११ सामन्यांत १६ गुणांची कमाई केली आहे तर चेन्नई १२ सामन्यांत १५ गुणांची कमाई केली आहे. चेन्नईचे आणखी दोन सामने, तर गुजरातचे तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या दोन्ही संघाचा प्रवेश निश्चित मानला जातोय. पण इतर संघांचे आगामी सामने लक्षात घेता गुजरात आणि चेन्नई क्रमवारीत खाली येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
प्ले-ऑफमधील त्यांचा प्रवेश आज निश्चित आहे, ते पाचव्या क्रमांकाच्या खाली जाणार नाहीत, हेही निश्चित आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत पहिल्या पाचमध्ये त्यांचा क्रमांक कोणता असेल, याबद्दल आत्ता बोलणे अत्यंत अवघड आहे. कारण खालील क्रमांकांवर असलेले मुंबई, लखनौ, राजस्थान आणि कोलकाता यांचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये आणि सरासरीमध्येही वाढ होऊ शकते. या संपूर्ण परिस्थितीत आता दिल्लीच्या सर्व आशा मावळल्या आहेत.
बुधवारी चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर प्ले-अॉफमध्ये पोहोचण्याचे जवळपास सगळे मार्ग दिल्लीसाठी बंद झालेले आहेत. दिल्लीचे अद्याप तीन सामने शिल्लक असले तरीही या तीन सामन्यांमध्ये त्यांना प्ले-अॉफचे स्वप्न साकारता येणार नाही, हे निश्चित आहे. तर बंगळुरू, पंजाब आणि हैदराबाद अधांतरी आहेत.
कोलकाता-राजस्थान आज भिडणार
या स्पर्धेत सातव्या क्रमांकावरून वर झेप घेणाऱ्या कोलकाता संघाला आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान मोडीत काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. कारण आज कोलकाता पराभूत झाले तर त्यांच्या प्ले-अॉफच्या आशा कमी होत होतील. अर्थात तीच स्थिती पाचव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानचीही आहे. पण आज कोलकाताने विजय प्राप्त केला तर ते सरासरीच्या जोरावर थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतील.
IPL 2023 Points Table Play Off Teams