इस्तंबूल (तुर्कस्तान) – कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा घाला घातला आहे. त्यामुळेच अनेक देशांमध्ये महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल, डिझेलसह किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांनी नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान, तुर्कस्तान सारख्या देशांमध्ये स्वस्तातील ब्रेड घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागताना दिसत आहेत.
काही तज्ज्ञांच्या मते, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रोजेप तय्यप एर्दोगान यांच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच तुर्कीचे चलन लिरामध्येही ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत लिरा सात टक्क्यांनी घसरला आहे. सध्या एका डॉलरची किंमत 14.20 लीरा आहे. गेल्या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत लिरा 48 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जनतेला प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे. यासोबतच, या देशाचे नाव जागतिक वॉच लिस्टमध्ये असल्यामुळे तुर्कीमधील परदेशी गुंतवणूकही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
तुर्कस्तानचे राष्ट्रीय चलन, लिरा, डॉलरच्या तुलनेत या व्यापक घसरणीचे मुख्य कारण म्हणजे तुर्कीच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कमी ठेवण्याचे अध्यक्षांचे अपारंपरिक आर्थिक धोरण होय. महागाईमुळे तुर्कस्तानच्या अनेक शहरांमध्ये अनुदानित ब्रेडसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनुदानित दुकानांमध्ये 250 ग्रॅमच्या ब्रेडच्या पॅकेटची किंमत 1.25 लीरा आहे. तर सामान्य दुकानात 2.50 लीरा मिळत आहे.
दुकानाबाहेर रांगेत उभे असलेल्या एका 71 वर्षीय सेवानिवृत्त कामगाराने सांगितले की, देशात अन्नापासून ते ब्रेड, शर्ट्सपर्यंत सर्व काही महाग होत आहे. निवृत्तीनंतर, मला सामाजिक सुरक्षा अंतर्गत दरमहा 800 लिरा मिळतात, एकट्याच्या जगण्यासाठी ते पुरेसे नाही, आमच्यापैकी प्रत्येकजण दिवसातून किमान एक ब्रेड खातो, म्हणून मी येथून चार खरेदी करण्याचा विचार करत आहे.
तुर्कीमध्ये वार्षिक चलनवाढीचा दर 21 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. इस्तंबूल महानगरपालिकेचे महापौर एकरेम इमामोग्लू यांनी म्हटले आहे की, या शहरात राहण्याचा खर्च एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. इस्तंबूल पुरवठा कार्यालयाच्या मते, गव्हाच्या किमतीत 109 टक्के, सूर्यफूल तेल 137 टक्के, टॉयलेट पेपर 90 टक्के, साखर 90 टक्के आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत 102 टक्के वाढ झाली आहे.