मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. त्यात खासकरुन एसटी कर्मचाऱ्यांचा असलेला संप हा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारने चांगली पगारवाढ दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर येण्याचे आवाहन केले होते. त्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होतो की अन्य काही पर्याय समोर आणला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भारतातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित हे सध्या महाराष्ट्रात आहेत. तसेच, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्राधान्याने चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाला थोपविण्यासाठी आणखी काय पावले उचलली जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यादृष्टीनेही मंत्रिमंडळात काय चर्चा आणि निर्णय होतो, हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
सुप्रिम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पुढील आठवड्यात राज्यातील अनेक नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. तसेच, पुढील महिन्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या प्रमाणात निवडणुका आहेत. त्यामुळे याबाबत राज्य सरकार काही तरी ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.