मुंबई – एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांच्या कार्डचा तपशील सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने एचडीएफसी बँकेकडून व्यावसायिक संकेतस्थळ/ अॅपवर जतन केलेला तपशील हटविण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर बँकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती मेसेजद्वारे ग्राहकांना देण्यात येत आहे.
आतापर्यंत ग्राहकांनी कार्डचा तपशील एकदा भरल्यानंतर संकेतस्थळावर तो कायमस्वरूपी उपलब्ध असायचा. नव्या नियमांतर्गत ग्राहकांना प्रत्येक परतफेडीवर कार्डचे पूर्ण विवरण नोंदवावे लागणार आहे. तसेच आरबीआयकडून ग्राहकांना टोकन पद्धत निवडण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.
टोकन सिस्टिम म्हणजे काय?
कार्डचा तपशील देण्याचा टोकन व्यवस्था (टोकनायझेशन) हा पर्यायी मार्ग आहे. त्याअंतर्गत वास्तविक कार्डचा तपशील देण्याऐवजी विशिष्ट पर्यायी कोड जनरेट होतो. त्यालाच टोकन असे म्हटले जाते. २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा टोकन व्यवस्थेचा उल्लेख केला होता. त्याअंतर्गत अधिकृत कार्ड नेटवर्कच्या मागणीवरून टोकन सेवा प्रदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ पासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड या दोन्हींवर टोकन पर्याय असेल. हा पर्याय फक्त देशांतर्गत आर्थिक व्यवहारासाठी लागू असेल. आंतरराष्ट्रीय व्यवहारावर नसेल.