इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेहनत करणाऱ्यांच्या यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हे सिद्ध करणाऱ्या उदाहरणांमध्ये विजय अग्रवाल यांचा क्रमांक अग्रणी आहे. कधीकाळी केवळ ५ हजार रुपयांच्या नोकरीपासून सुरुवात करणाऱ्या अग्रवाल यांनी केवळ आणि केवळ मेहनतीच्या जोरावर आज ५ हजार कोटींचा व्यवसाय उभा केला आहे.
भावाच्या दुकानातून व्यवसायाचे गणित शिकणाऱ्या विजय अग्रवाल यांनी आज स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. बिहारच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या विजय अग्रवाल हे आज फक्त भाड्यातून ७६९ कोटी रुपयांहून अधिक कमावतात. हैदराबादमधील त्यांच्या एका इमारतीचे भाडे दरमहा ४.१४ कोटी रुपये आहे. सत्त्व ग्रुपचे एमडी विजय अग्रवाल हे बिहारमधील एका छोट्या शहरातील आहेत. ते बिहारच्या किशनगंजचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील १९६५ साली बांगलादेशातून भारतात आले. वडील छोटासा व्यवसाय करायचे.
विजय ९ भावंडांसोबत किशनगंजमध्ये एका छोट्या घरात राहत होते. सोयी-सुविधा मर्यादित होत्या, त्यामुळे बालपण उणीवांसह गेले. त्यांच्या बहिणीचे लग्न झाल्यावर ते तिच्यासोबत पश्चिम बंगालच्या राजीगंज येथे गेले. त्यांचे नातेवाईक दुकान चालवायचे. त्याच दुकानात विजय हे मदत करायचे. या दुकानातून त्यांनी व्यवसायाच्या युक्त्या शिकून घेतल्या. यावेळी त्यांना मार्केटिंगपासून ते ग्राहकांशी बोलणी कशी करायची हे सगळं शिकवलले. १९८५ मध्ये, ते तेथून कोलकाता येथे गेले, तेथे ते एका वित्तीय निगम कंपनीत रुजू झाले. त्यांची कंपनी बिल्डरांचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करत असे. येथे त्यांनी बांधकामाशी संबंधित कामे शिकून घेतली.
१९९३ मध्ये सुरू झाला पहिला प्रकल्प
अग्रवाल यांचे गुरू जीडी सालारपुरिया यांच्यासमवेत त्यांनी १९९३ मध्ये बंगळुरूमध्ये पहिला प्रकल्प सुरू केला. २००० मध्ये त्यांनी अनेक छोटे-मोठे प्रकल्प सुरू केले. त्याच्या प्रगतीची कहाणी इथून सुरू झाली. या दोघांनी मिळून सालारपुरिया – सत्व ग्रुप ही कंपनी सुरू केली. आयसीआरएच्या २०२१ च्या अहवालानुसार, त्यांच्या कंपनीने ५५.४ कोटी स्क्वेअर फूट एरिया तयार केला आहे. २०२१ पर्यंत कंपनीचे भाडे उत्पन्न ७६१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.









