इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फास्टफूडमध्ये हमखास आवडीच्या पदार्थांपैकी एक असलेल्या मोमोजच्या अतिसेवनाने एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अती तिथे माती, असे आपण ऐकलेले आहे. कुठलीही गोष्ट अती केली की त्याचे दुष्परिणाम दिसतात. असाच प्रकार बिहारमधील गोपालगंज येथे घडला आहे. काही युवकांनी १५० मोमोज खाण्याची अनोखी शर्यत लावली. या विपिन कुमार पासवान असे या तरुणाचे नाव असून मोमोज खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. शर्यतीपोटी युवकाला जीव गमवावा लागला आहे.
याबाबत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन शुक्रवारी आपल्या दुकानात बसला होता. यावेळी त्याचे मित्र त्याला मोमोज खायला सोबत घेऊन गेले. त्यांची कोण किती मोमोज खाणार याबाबत पैज लागली होती. यावेळी विपीनने १५० मोमोज खाऊन पैज जिंकली. यानंतर विपिन त्याच्या दुकानात आला. मात्र दुकानात आल्यानंतर थोड्या वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर बेशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ठावे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या घटनेने मृत तरुणाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विष कालविल्याचा आरोप
मृता युवकाच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर विष पाजून हत्या केल्याचा आरोप केला आहे. मोमोजमध्ये विष घालून मुलाला मारल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहे.