नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धारदार चॉपर बाळगणा-या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. गंगापूररोडवरील शहिद चौक भागात ही कारवाई करण्यात आली असून संशयिताच्या ताब्यातून लोखंडी चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम सुनिल दुसाने (१८ रा.कुमावतगल्ली अशोकनगर) असे संशयित चॉपरधारीचे नाव आहे. वर्दळीच्या गंगापूररोडवरील शहिद चौकात असलेल्या एका तरूणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी (दि.५) दुपारी पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत टोकदार लोखंडी चॉपर मिळून आला. याबाबत हवालदार संजय ताजणे यानी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार मोरे करीत आहेत.