नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई शरणपूररोड भागात करण्यात आली. या भागात सराईतांनी काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्याने संशयित पोलीसांच्या रडारवर आला होता. पोलीसांनी त्यास हुडकून काढले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल राजेंद्र नागोलकर (२५ रा.बेथलेनगर शरणपूर) असे अटक करण्यात आलेल्या तडिपार संशयिताचे नाव आहे. नागोलकर याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षासाठी त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलासांना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांना तो स्थानबध्द कारवाईतून जेल बाहेर आलेल्या हर्षद पाटणकर याच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी त्यास आपल्या रडारवर घेत हुडकून काढले. तिबेटीयन मार्केट भागातील यश मटन भाकरी हॉटेल परिसरात तो असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. याबाबत अंमलदार अजय ससाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.