नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ कवी, भाषातज्ञ, समीक्षक चंद्रपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे शुभवर्तमान, योगभ्रष्ट, चित्रलिपी या कवितासंग्रहासह ललित साहित्य, वैचारिक तसेच संशोधनपर साहित्य प्रसिद्ध असून त्यांच्या साहित्याचे अन्य भाषेतही भाषांतर झालेले आहे. कविवर्य डहाके सरांना साहित्य अकादमी तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थाननेही सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, माष्टर दिनानाथ प्रतिष्ठान अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
तसेच विश्वस्त म्हणून प्रसिद्ध समीक्षक, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, पत्रकार, संपादक आणि लेखिका संध्या नरे-पवार, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी दिली आहे.