इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सुरतः सुरतच्या सचिन पाली गावात सहा मजली इमारत कोसळली. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथकाने रात्रभर बचावकार्य केले. सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले, की,रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत सात मृतदेह सापडले आहेत.
पोलिसांनी सांगितले, की बचावकार्य सुरू आहे. अजूनही बरेच लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे. ही जुनी इमारत होती.जीर्ण झालेली इमारत अचानक कोसळली. या सहा मजली इमारतीत ३५ खोल्या होत्या. त्यात पाच ते सात कुटुंबे जीव धोक्यात घालून राहत होती. या इमारतीची मालक एक विदेशी महिला आहे. तिच्या वतीने येथे खोल्या भाड्याने देत असे. इमारत कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले, की इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ही इमारत २०१६-१७ मध्ये बांधण्यात आली होती. पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते, त्यापैकी बहुतेक लोक या भागातील कारखान्यांमध्ये काम करत होते. अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास अहवालाच्या आधारे दोषींवर कारवाई केली जाईल.