इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन कमी करण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेच्या कामकाजात उद्यापासून सहभागी होणार आहेत.
दानवे यांच्या निलंबनाच्या फेरविचाराचा ठराव सभागृहात चद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यांचे निलंबन पाचऐवजी तीन दिवस करावे, अशा ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. भाजप आमदार प्रसाद लाड यांना दानवे यांनी शिवीगाळ केल्याने त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागितली होती. दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदूविरोधी वक्तव्यावरून विधान परिषदेत चर्चा सुरू असताना दानवे आणि लाड यांच्यात वाद झाला. दानवे यांनी लाड यांना पाचअक्षरी शिवी दिल्याने त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले, तरी दानवे शिवीगाळीवर ठाम होते. सभागृहाबाहेर लाड यांना ‘प्रसाद’ देऊ, अशी धमकी त्यांनी दिली होती; मात्र ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. दानवे यांच्या वक्तव्यावर त्यांनी माता-बहिणींची माफी मागितल्यानंतर १८ तासांनी दानवे यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करणारे पत्र डॉ. गोऱ्हे यांना पाठवले होते. त्यात निलंबनाचा फेरविचार करावा, निलंबन रद्द करावे, अशी मागणी केली होती.
आता निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आल्यानंतर दानवे यांनी निलंबन मागे घेण्यास उशीर केला असल्याचे म्हटले आहे. उद्यापासून मी सभागृहात जाणार असून आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.