किरण घायदार, नाशिक
गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या स्वमालकीच्या २ हजार ४०० नवीन एसटी खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याने या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील ३०० गाड्या नोव्हेंबर महिन्यात महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने नव्या लालपरीतून प्रवाशांना दिवाळीनंतर प्रवास करता येणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १५ हजार ८०० एसटी आहेत. त्यापैकी ८०० बस मालवाहू ट्रकमध्ये रुपांतरीत केल्या आहेत. उर्वरित १५ हजार बसपैकी दोन हजार बसचे आयुर्मान संपत आल्याने पुढील तीन महिन्यांमध्ये या बस प्रवासी वाहतुकीतून भंगारात जाणार आहेत. त्यातच काही बस नादुरुस्त असल्याने प्रवासी सेवेत धावत नाहीत. त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यात गाड्यांची कमतरता आहे.
विविध सवलतींमुळे प्रवासी संख्या ५५ लाखांच्या घरात पोहोचल्याने गाड्यांची संख्या अपुरी आहे. यामुळे साध्या २ हजार २०० आणि दोनशे अशा एकूण २ हजार ४०० गाड्या खरेदीचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला होता. प्रस्ताव मंजूर करून 2023-2024 च्या अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत तब्बल वर्षभर तयार गाड्या खरेदीचा प्रस्ताव रखडला होता. आता त्यावर एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाली आहे. २ हजार ४०० तयार बस बनवून देण्याची निविदा लेलँड कंपनीला मिळाली असून येत्या ३ महिन्यांत तयार बसचा पुरवठा सुरू होईल. दरमहा ३००-४०० बस याप्रमाणे मार्च २०२५ अखेर सर्व २ हजार ४०० बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
गाड्यांची मागणी वाढतेय
शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतुकीसाठी शालेय फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यातच ग्रामीण भागात विविध सवलतींमुळे एसटीची प्रवासीसंख्या वाढते. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी एसटीची मागणी सातत्याने वाढत आहे. अशातच नव्या एसटी ताफ्यात दाखल होण्यासाठी किमान तीन महिने वाट पाहावी लागणार असल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मंत्री दादा भुसे यांनी दिली ही माहिती
महामंडळाच्या ताफ्यात ५१५० नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मागणीनुसार सर्व आगारांना बस देण्यात येत आहेत. बी. एस. मानकाच्या २४२० बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच १ हजार जुन्या डिझेल बस सीएनजीवर आणि ५ हजार बस एलएनजी (लिक्विड नॅचरल गॅस) वर रूपांतरित करण्यात येत आहे. यामुळे डिझेल व दुरुस्तीवरील खर्चात बचत होणार आहे.