इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता भंग केल्याच्या कारणाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर निवडणुक आयोगाने माहिती मागवून त्याची तपासणी केल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश दिले.
उद्धव ठाकरे यांनी २० मे ला ही पत्रकार परिषद घेतली होती. या दिवशी मुंबईतील सर्व सहा लोकसभा जागांसह राज्यातील एकूण १३ जागांवर मतदान सुरु होतं. त्यावेळी मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे हे मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. तसेच मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. पण निवडणूक यंत्रणा कमी पडली. निवडणूक आयोगाकडून मुद्दाम ज्या ठिकाणी ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त मतदान होऊ शकतं तिथे मतदानासाठी मुद्दाम जास्त वेळ लावला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
निवडणूक आयोगाच्या दिरंगाईमुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. अखेर कंटाळून अनेक मतदारांनी रांगेतून बाहेर पडत मतदान न करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावरही निशाणा साधला होता. त्यानंतर भाजपने तक्रार केली होती.