इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरः मुंबईमधील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भंवरलाल गुप्ता याचा कोल्हापूरमधील कारागृहामध्ये पाच आरोपींनी खून केला आहे. त्याचे डोके फोडून हा खून केल्याचे समोर आले.
या खुनानंतर पोलिसांनी इतर आरोपींच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटामधील चार आरोपींना कोल्हापूरच्या कारागृहात ठेवण्यात आले असून ते तेथे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. खान आणि दुसऱ्या एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले पाच जण एकाच बराकीत होते. पाच जणांनी खान याचे डोके फोडून त्याला संपवले.
प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध अशी खून केलेल्या आरोपींची नावे आहेत. कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी ही माहिती दिली. आरोपींनी खून का केला? खूनामागचा त्यांचा हेतू काय होता? त्यांच्यात काही वाद झाला का? याचा तपास पोलिस करीत आहेत.