इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात रोज नवीन नवीन अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात सरकारने चौकशी समिती नेमली असून त्यांनी चौकशीचे काम सुरु केले आहे. या तीन सदस्यीय कमिटीने या प्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर त्यात आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्याच्या अगोदर डॅा. अजय तावरे व आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हॅाटसअॅप व फेसटाइमवर १५ वेळा कॅाल झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ८.३० ते १०.४० दरम्यान हे कॅाल केले गेले. त्यानंतर सकाळी ११ वाजता ब्लड सॅम्पल घेतले गेले.
या अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या दोन डॅाक्टरांना अटक करण्यात आली आहे. रक्ताचे नमूने बदलण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॅा. श्रीहरी हळनोर, डॅा. अजय तावरे यांना अटक केली आहे. ससून रुग्णालयातील सीएमओ डॅा. श्रीहरी हननोर यांनी रक्ताचे नमूने पहिल्यांदा घेतले. त्यासाठी त्याला तीन लाख मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
या अटकेनंतर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले की, या डॅाक्टरांवर ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. आरोपीचे ओरिजनल ब्लड सॅम्पल ससुनच्या डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलेले आहेत.