मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपशी आताच बोलून महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबर्इच्या बैठकीत केली. त्यावर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यात त्यांनी छगन भुजबळांना आवरलं पाहिजे असे म्हटले आहे.
काल भुजबळांनी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या. लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात गडबड होता कामा नये. आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी ८०-९० जागा देण्याचा शब्द दिला होता. ते म्हणाले, की लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको. किती जागा हव्या हे त्यांना सांगावे लागेल. ८०-९० जागा मिळाल्या, तर ५०-६० निवडून येणार. तुमचे ५० आहेत, मग ५० घ्या, असे होता कामा नये. असे विधान केले होते.
त्यावर आज निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.