बीड (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क)- केज तालुक्यातील मुंडेवाडी व नारेवाडी या दोन गावांनी मराठा व्यापाऱ्यांकडून खरेदी न करण्याचा, मराठा कीर्तनकारांना सप्ताहात न बोलावण्याचा तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्यांना दोन हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. बहिष्काराची भाषा वापरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मराठा समाजावर कथित बहिष्काराची भाषा वापरणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची तत्काळ दखल घेतली. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दोन्ही गावांतील प्रमुख दोन्ही समाजातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढली. एकत्र चहापान केले. त्यानंतर हा वाद मिटवला.