इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : पोर्शे अपघात प्रकरणातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना निलंबित केल्यानंतर आता त्यांच्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ समिती स्थापन करण्यात आली आहे; परंतु या समितीच्या अध्यक्षावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
यावर निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यात म्हटले आहे की, ससून प्रकरणातील डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून “उंदराला मांजर साक्ष” ही म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर वरिष्ठांनी बांधलेला नाही ना? राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा! भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांकडेच भ्रष्ट डॉक्टरांची चौकशी असे म्हटले आहे.
‘एसआयटी’ समितीच्या अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे असून या समितीत डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांचा समावेश आहे. डॉ. पल्लवी यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आले आहेत. डॉ. सापळे या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत. डॉ. सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता.
जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर पाच ते दहा टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होता. या विषय़ावर विधानसभेत चर्चा झाली होती. डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याचे एक लाख रुपयांचे बील शासनाला सादर करतात. हा खर्च सुमारे ऐंशी लाख रुपये आहे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून त्यांनी १३ लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान केल्याचे दाखवले.