नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या निवडणुकीच्या मतदानात एक मोठी झेप घेत जम्मू आणि काश्मीरने गेल्या 35 वर्षातील सर्वात जास्त निवडणूक सहभागाची नोंद केली आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातील( लोकसभेच्या 5 जागांसाठी) मतदान केंद्रांवर 58.46 % इतक्या एकत्रित मतदानाची(VTR) नोंद झाली. निवडणुकीतील हा लक्षणीय सहभाग म्हणजे या प्रदेशातील जनतेच्या भक्कम लोकशाही भावनेचा आणि नागरी सहभागाचा एक पुरावा आहे. या केंद्रशासित प्रदेशात अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांचे आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या मतदारांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या शुभेच्छा व्यक्त करताना राजीव कुमार म्हणाले, “2019 पासून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत झालेली 25% वाढ, सी-व्हीजिल तक्रारींवरून दिसणारा नागरिकांचा वाढता सहभाग आणि सुविधा पोर्टलवर रॅली काढण्यासाठी विनंती करणारे 2455 अर्ज इ. द्वारे प्रतिबिंबित होत असलेला, साशंकतेपासून दूर जात एका निश्चित विश्वासाने, संपूर्ण सहभागाने निवडणुका आणि प्रचाराच्या अवकाशाकडे वळलेला कल यांच्या आधारावर ही उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात मुख्यत्वे श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग राजौरी, उधमपूर आणि जम्मू या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.