नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी रविवारी (दि.२६) गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात दोन महिलांसह एका ५० वर्षीय अनोळखी इसमाचा समावेश असून तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव व अंबड पोलीस ठाण्यात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिलापूर ता.जि. नाशिक येथील लक्ष्मी अंबादास कहांडळ (३०) या विवाहीतेने रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती अबादास कहांडळ यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दुसरी घटना महामार्गावरील पिंक सिटी हॉटेल परिसरात घडली. ओझर कडून नाशिकच्या दिशेने येणा-या मार्गावरील पिंकसिटी हॉटेल परिसरातील झुडपात एका ५० वर्षीय अनोळखी इसमाने झाडास गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. अज्ञात कारणातून सदर इसमाने झाडाच्या फांदीस दोरी बांधून गळफास लावून घेतला असून त्याची अद्याप ओळख पटली नाही. याबाबत हर्षल पाटील यांनी खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार राजूळे व हवालदार मगर करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील पाटील नगर भागात घडली. कोमल अशोक पाटील (२३ रा.पाटीलनगर,सिडको) यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अमलदार गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.