योगेश भास्कर कातकाडे (आर्थिक सल्लागार)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस संगणक, मोबाईल व इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या अनुषंगाने होणारे सायबर हल्ले आणि फसवणुक ही अतिशय चिंताजनक बाब आहे. अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यात किंवा फसवणुकीत सुशिक्षित तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक देखील कळत- नकळत बळी पडत आहेत. आजच्या आधुनिक डिजिटल युगात बहुतांश लोक आर्थिक व्यवहार सर्रास ऑनलाइन पद्धतीने करत आहेत. मात्र याबाबत पुरेशी जागरुकता व खबरदारी नसल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याने अनेकदा सायबर फसवणुक बाबतच्या घटना वारंवार ऐकण्यात येतात.
या फसवणुकीमध्ये प्रामुख्याने होणाऱ्या घटना जसे की, तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मुदत संपली आहे, तुम्हाला त्या पॉलिसीचे पैसे देणार आहोत, नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींना, महिलांना, जॉबचे आमिष दाखवून, वर्क फ्रॉम होम, पार्ट टाइम जॉब, वीजबिले न थकल्याचे, बँक खाते केवायसी करण्याबाबत, शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने, लॉटरी किंवा तुमच्या नावे काही पार्सल आले आहे; अशी इतर अनेक कारणे सांगत, ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाच्या उपयोग करून विविध माध्यमातून लोकांशी संपर्क करतात, त्याचा विश्वास संपादन करून कधी कधी यात सुरुवातीला काही पैसे मिळवून दिले जातात व नंतर लाखो रुपये उकळले जातात. लोकसुद्धा अशा अमिषाला बळी पडतात. आर्थिक व कर सल्लागार योगेश भास्कर कातकाडे यांच्याकडून “आर्थिक व बँकिंग क्षेत्राशी संबंधित सायबर हल्ले, ऑनलाइन आर्थिक फसवणूक” याबद्दल माहिती करून घेणार आहोत.
आर्थिक फसवणूक करणाऱ्या विविध राज्यात, देशात व देशाबाहेरही अनेक टोळ्या निर्माण होत आहेत. या टोळ्या एकाच ठिकाणाहून देशभर ऑनलाईन फसवणुकीचे काम करतात. गेल्या काही वर्षांत सायबर हल्ले, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढलेले असताना त्या तुलनेत गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना मात्र अपयश येत आहे. यामुळे तुम्ही स्वतः व तुमच्या कुटुंबातील सदस्य यांना आर्थिक व्यवहारांबाबत वेळीच खबरदारी घेत ऑनलाईन फसवणुकीच्या घटना पासून सावध केले पाहिजे.
ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी घ्यावयाची सावधगिरी
- तुमची वैयक्तिक बँक खात्यासंदर्भातली माहिती, ओटीपी, कार्ड नंबर, एटीएम पिन, सीव्हीव्ही नंबर आणि पासवर्ड कधीही कुणाशी शेअर करू नका. बँक देखील फोनवर अशी माहिती कधीही विचारत नाही.
- तुमच्या डिजिटल उपकरणात आवश्यक त्या इंटरनेट सिक्युरिटीचा वापर करावा.
- कधीही कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा अज्ञात ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका.
- इंटरनेट/डिजिटल ग्राहक सेवेचा लाभ घेण्यासाठी नेहमी बँकेची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपचाच वापर करा.
- तुमचा मोबाईल पिन, ट्रांझेक्शन पिन, एटीएम/ क्रेडिट कार्ड पिन, यूपीआय पीन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड नियमित बदला.
- असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय इंटरनेटचा वापर करून आर्थिक व्यवहार करू नका अशा वेळी तुमचा डेटा लीक होऊ शकतो.
- कोणताही यूपीआय क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लाभार्थीची माहिती सत्यापीत करा.
- स्कॅन द्वारे पैसे चोरण्यासाठी नकली क्यूआर कोड वापरतात. त्यामुळे तुमच्या रक्कमेच्या सुरक्षिततेसाठी नेहमी विश्वसनीय स्रोतांकडून क्यूआर कोड स्कॅन करा.
- तुमचा यूपीआय पिन कधी कोणाशी शेअर करू नका. कायम लक्षात ठेवा पैसे मिळवण्यासाठी यूपीआय पीन आवश्यक नाही.
- मोठ्या रक्कमेचे व्यवहारांसाठी डिजिटल/ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यापेक्षा बँके मार्फत व्यवहार करणे अधिक योग्य.- तुम्ही केवायसी संदर्भातील कागदपत्रे कुठेही जमा करतात त्यावेळी ती कोणत्या कामा संदर्भात देत आहात ते त्या कागदपत्रांवर नमूद करा.
अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेऊन ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतात. सतर्क राहा, सावध राहा !
योगेश भास्कर कातकाडे, आर्थिक सल्लागार ,मो. ९८८१८४३६१७