इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गाझियाबाद : देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तीमय भावनेने मंदिरात जातात; परंतु अशा मंदिरातील बाबा-बुवांमधील विकृत वृत्ती बाहेर येते, तेव्हा समाजातून संतापाचा कडेलोट होतो. गाझियाबादमधील मिनी हरिद्वार म्हटल्या जाणाऱ्या शनि मंदिरात महिलांचे वस्त्र बदलण्याच्या दालनात छुपा कॅमेरा लावलेला आढळून आला. त्यानंतर त्याच्या कारनाम्याचे अनेक प्रकरण बाहेर आले. या महंताने मंदिराच्या आजूबाजूला अवैध जमीनीवर कब्जा केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यावर बुडलोजर कारवाई करण्यात आली.
गंगनहर घाटावरील प्राचीन शनि मंदिरातील महंत मुकेश गोस्वामीविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या वस्त्र बदलण्याच्या ठिकाणावर छुपा कॅमेरा बसवून हा महंत मोबाईलवर त्यातील चित्रण पाहत होता. एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. मुरादनगरच्या पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिल्यानतंर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर महंत मुकेश गोस्वामीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आल्याचे समजताच हा महंत पळून गेला आहे. २१ मे रोजी दुपारी मुलीसह पीडिता गंगा घाटावर स्नान करण्यासाठी आली होती. कपडे बदलण्यासाठी ही महिला कपडे बदलण्यासाठी उपलब्ध असलेल्या रुममध्ये गेली, तेव्हा तिला वरच्या बाजूस कॅमेरा असल्याचे दिसले. महिलेने लगेचच रुममधून बाहेर येऊन संताप व्यक्त केला. रुममधील हा कॅमेरा महंत मुकेश गोस्वामी यांच्या मोबाईलशी कनेक्ट असल्याचे स्पष्ट झाले. पीडित महिलेने याबाबत विचापण करताच महंत गोस्वामीने अरेरावीची भाषा केली. अवमानजक शब्दात सुनावले. पोलिसांत तक्रार केल्यास परिणाम वाईत होतील, अशी धमकी दिली; मात्र महिलेने महंताच्या धमकीला भीक न घालता फिर्याद दिली. पोलिसांनी गंगा घाट परिसरातील कॅमेऱ्याची तपासणी केली. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच महंत फरार झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी गंगा घाटावर महंताच्या अवैध दुकानांवर जेसीबी चालवला. महंताची पाच दुकाने पाडण्यात आली आहेत. महंताच्या शोधासाठी पोलिसांनी पथक नेमले असून मोबाईल व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर जप्त केले आहेत. महिलांच्या कपडे बदलण्याच्या रुममध्ये कॅमेरा लावला नव्हता. माकडांनी हा कॅमेरा फिरवला, असा कांगावा त्याने केला आहे. महंताने तक्रारदार महिलेची माफी मागितली. या मंहतावर यापूर्वीचे चार खटले दाखल आहेत.