नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत म्हसरूळ गंगापूर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पहिली घटना सिडकोत घडली. रोहित रविंद्र बागले (रा. ऋग्वेद सोसा. शुभम पार्क ) यांनी फिर्याद दिली आहे. बागले यांची स्प्लेडर एमएच १५ डीडी ४९०३ गेल्या बुधवारी (दि.२२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.
दुसरी घटना दिडोरीरोड भागात भागात घडली. महेश संजय पाटील (रा. शिवस्वामी अपा. पार्क साईड जवळ) हे शुक्रवारी (दि.२४) आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी दिडोरीरोड भागात गेले होते. सिनर्जी हॉस्पिटल आवारातील पार्किंगमध्ये त्यांनी आपली एमएच १९ डीपी २३९१ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
तिसरी घटना गंगापूर शिवारात घडली. शांताराम गायकवाड (रा.ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.११) सुला वाईन रोड भागातील कानेटकर गार्डन येथे गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ बीव्ही ८६२५ चोरट्यानी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.