इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
घराघरात पोहोचलेल्या विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पेंढारकर यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी नागपूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वदेशी आयुर्वेदिक उत्पादनाला जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविण्यात मोठे योगदान त्यांनी दिले. एक निष्णात वकील आणि नागपूरकर असलेल्या यशवंतरावांना धार्मिक ग्रंथ वाचनाची सुद्धा आवड होती. व्यवसाय सांभाळतानाच ही आवड त्यांनी कायम जपली. उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल. यशवंतराव हे कायमच उद्योगातील नव्या पिढीचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय व दीप, मुलगी दीप्ती, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश प्रभारी प्रदीप पेशकार यांनी श्रध्दांजली अर्पण केली.